सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वृद्धाश्रम

साहित्य, लेखन, सांस्कृतिक, संस्कृती सर्व जागी हर भाषेत माया ममता माय मायेचा आईचा महिमा मंडित केला आहे. समर्थ रामदास स्वामींनी तर आईच्या थोरवीला सर्व प्रकारच्या लेखनाच्या, कल्पनेच्या पलीकडे जाऊन एक सत्य एका वाक्यात आईची महत्ता सांगितली आहे. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” !
ज्याला आई नाही त्यांचे जीवन बघा. ज्यांची आई लहानपणीच वारली, त्यांची जीवनशैली बघा. जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. ह्याला कारण देखील असेच् आहे. “आईचे प्रेम” हे एकच् तत्व आईला हरघडीला अजरामर करून जाते. मुल जेव्हा लहान असते त्यावेळी ती स्वत्व विसरून जाते आणि फक्त आपल्या अपत्याच्या संगोपनात विरून जाते. घराच्या अंगणात, फ्लॅटच्या अंगणात तुम्ही कितीतरी वेळा बघितले असेल की हातात वरणभाताची ताटली घेतलेली आई मुलाला / मुलीला खेळवत खेळवत अपत्याला जेवणाचा एक एक घास भरवित असतात. कारण काय तर प्रेमापोटी संगोपनात कुठलाही कसुर नको म्हणून जीवापाड जपणारी आईची ममता. आपण कित्येक पुरुषांना म्हणताना ऐकले असेल की “तू जेवण बनविते खूप सुंदर पण आईच्या हातची चव, तुझ्या अन्नाला किंवा जेवणाला पदार्थांना येत नाही”! ह्या वाक्याचे कधी कोणी विश्लेषण केले आहे? ह्या वाक्यात आईच्या प्रेमाचे सर्व राज लपले आहेत. आपल्याला रेस्टॉरंट मधील जेवण खुप आवडते. पण म्हणून आपण रोज जात नाही. आठवड्यातील एक दोन दिवस चेंज म्हणून जातो. रोज रोज हे जेवण आपल्याला पचणार नाही. असे ही म्हणतो! का बरं? कारण हॉटेल मधील जेवण व्यवसायिक फायद्यासाठी असते. त्यात प्रेम नसते. ते जेवण वाढताना ते सजवून आणले जाते. त्या जेवणाला चव असते पण पदार्थात आत्मियता नसते, प्रेमाचा गोडवा नसतो म्हणून हे जेवण रोज रोज खाल्ले तर पचणारे नसते. ती.. “ती आत्मियता – ते निस्वार्थ प्रेम” जे आईने बनविलेल्या प्रत्येक पदार्थाच्या कणाकणात सामावली असते, प्रेमाने बनविलेले ते जेवण त्याच्या कणाकणात प्रेम दडलेले असते की माझ्या मुलाने मोठे बनावे, सुंदर बनावे, अन्नाने त्याच्या अंगात ताकद यावी, माझा मुलगा सर्व मुलात चांगला व्हावा. असे असंख्य सुविचार गुंफलेल्या चांगल्या विचाराने, मायेच्या ममतेने बनलेले रूचकर अन्न ताटातून ममतेच्या हाताने मुलाच्या पोटात जाते आणि मोठा झाल्यावर आपसूकच पुरुष मंडळी आपल्या अति सुगरण बायकोला सुनावतात,”आईच्या हाताची चव तुला नाही यायची” ! ही आईची माया! आई इथे जिंकते, आईचे गुणगान म्हणजे तिच्या मुलांप्रती असणाऱ्या समर्पणाची, स्वत्वाला विसरून पोरांचे संगोपन करताना ची थोरवी म्हणून आईचा मान. नऊ महिने पोटात, घट्ट नाळेशी बांधलेल्या अर्भकाला आईच्या भावनेतून मिळणाऱ्या प्रेमाचा असर होत असतो. ते अर्भक नऊ महिन्यानंतर आईशी नाळ तोडतं, जन्माला येत आणि जन्मभरासाठी आईच्या प्रेमाच्या नाळेशी आपसूक जोडल्या जातं. पहिले पाचसहा महिने त्याचा आहार म्हणजे आईचे दूध. जे सभोवतालच्या वातावरणाशी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवित असते आणि त्याला जगात उभे करण्याची तयारी करीत असते.
आईची थोरवी जरी महान असली तरी आर्थिक संगोपनाची जबाबदारी घेणारा पिता त्या थोरवी ला गोडवा आणत असतो. मुलांच्या संगोपनात कमी पडायला नको म्हणून पिता आटापिटा करीत असतो, आपापल्या कुवतीनुसार मुलांना मोठे करीत असतो. पण पित्याच्या थोरवी चे गोडवे कोणी गात नसतो कारण नारळासारखा बाहेरून कठीण पिता आतून खोब्र्यासारखा मऊ आहे हे कोणालाच जाणवत नाही किंवा पिता जाणवू देत नसतो. काही प्रसंगी पैशाअभावी मुलांच्या संगोपनात काही कमी जास्त झाले तरी हा पिता नारळाप्रमाणे मजाल आहे कोणाला डोळ्यातील अश्रू दिसतील तर! ते अश्रू सुद्धा नारळा प्रमाणे आत – मनात, आतल्या आत रडत असतो. कोणाला कळत सुद्धा नाही त्याची “रड्” चालली आहे मनातल्या मनात म्हणून. घरासाठी, पोरांसाठी, घराला मोठे करण्यासाठी रात्रंदिवस मरमर करणारा पिता हा घराचे छत्र असतो, आधार असतो. घराचा गोडवा असतो. आईच्या थोरवीला पित्यामुळे गोडवा येतो. आणि गुणगान आईचे होते आणि पिता आपल्या कर्तव्यात व्यस्त असतो. मुलाबाळांच्या संगोपनासाठी स्वतःच्या तब्येतीची काळजी करीत नाही की बाहेरच्या मौसम ची तब्येत बघत नाही. त्याचे ध्येय एकच् घराचा मौसम आणि घराची तब्येत जपण्यासाठी काय आटापिटा लागेल तो छातीला माती लावून करायचा आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना जगातील सर्वात सुंदर काय देवू शकतो ते द्यायचे. मध्यमवर्गीय कुटुंबात तर अशा पित्याला तारेवरची कसरत असते.
असाच् पातळ बांध्याचा ठेंगण्या ठुसक्या उंचीचा, डोक्याला टकलेला, छोटीशी मिशी बारीक ओठाशी असणारा, तोंडात सतत पानाचा तोबरा किंवा सुपारीचे खांड ठेवणारा “विठ्ठल”. घरात एक मुलगा एक मुलगी झाली की आपण त्याला “कुटुंब संपुर्ण झाले किंवा संपुर्ण कुटुंब” अशी संज्ञा देतो. दोन अपत्यांचा पिता विठ्ठल आणि त्याला जोडास जोड आणि तोडीस तोड पत्नी रखुमाई. निनाद लहान मुलगा तर भैरवी मोठी मुलगी. विठ्ठल ची सरकारी नौकरी पण छोट्याशा गावी. मुलं मोठी झाली आणि मुलांना चांगल्याप्रकारे शिक्षण मिळावे म्हणून रखुमाईला जवळच्या मोठ्या शहरात हालवावे लागले. विठ्ठल रखुमाई चा जोडा आता मुलांच्या संगोपनासाठी विभक्त झाला. तसे पाहिले तर लहानग्या गावात शिक्षण झाले नसते का? झाले असते! पण जगात आपली पोरं टिकवायची असतील तर चांगले शिक्षण आवश्यक मग त्यासाठी विठ्ठल रखुमाई ने चांगला निर्णय घेतला की रखुमाई आणि मुलं जवळच्या शहरात राहायला आलेत. एक सुखी कुटुंब. अंथरूण पाहून हातपाय पसरणारे. अर्थात आठवड्याअंती एकमेकांची भेट घ्यायला चुकत नसे. आणि विठ्ठल रखुमाई चा संसार सुखात चाललेला.
दोन्ही मुले अभ्यासात हुशार, वर्गात पहिल्या पाचमध्ये – शिक्षकांच्या नजरेत असणारी. त्याकाळी खेडेगावात, शहरात लाईट जाणे ही गोष्ट अगदीं नित्याची. फोन देखील एसटीडी बुक करून जोडावा लागायचा. आज काल जसे सर्व कुटुंबीय देश विदेशात असले तरी दिवसातून चारदा बोलू शकतात अशी व्यवस्था नव्हती. असेच एकदा लाईट गेले असताना अभ्यासाच्या नादात भैरवी ने रॉकेलचा जुना कंदील माळ्यावरून उतरविला, रॉकेल भरले नी कंदिलाचा भडका उडाला नी भैरवी ने पेट घेतला. अंगावर ब्लॅंकेट वगैरै टाकून भैरवी ला वाचविण्यात यश आले तर चेहरा वगळता पोटापर्यंत भैरवी चांगलीच् भाजली. मुलगी म्हटली की पित्याच्या कलेजाचा टुकडा असतो. पोरीसाठी पित्याचा जीव तिळतिळ तुटत असतो. माने पासून ते पोटापर्यंत प्लास्टिक सर्जरी त्या काळी दोन लाखाची रक्कम लागणार होती. कितीवेळा विठ्ठल मनातल्या मनात नारळातील पाण्यासारखे अश्रू मनात ठेवून स्वतः ला कुढवित होता कोण जाणे. पण पोरगी म्हणजे परक्याचे धन – असे भाजल्या शरीराने कसे पाठविणार? कसा, कुठुन कायसा विठ्ठलाने दोन लाखाची रक्कम विठ्ठलाने उभी केली आणि भैरवी दिसायला पुर्ववत झाली.
रखुमाई म्हणाली विठ्ठलाला अहो! इतकी रक्कम कुठुन आणली? परत कशी करणार? आता एवढ्या पगारात कसे भागणार आतातर पगाराच्या भागाकारात हे दोन लाख जोडलेत!
मुलांसाठी काही पण करण्याची तयारी असणारा पिता तो. त्याला पण धास्ती, भविष्यात घर चालवायचे कसे? आतातर दोन दोन ठिकाणी पैसा द्यावा लागतोय. पण परत नारळातले पाणी. बाहेर एक अश्रू आला नाही.
विठ्ठल म्हणाला रखुमाई त्याची काळजी तू कशाला करतेस? आहे की विठ्ठल – ठेवील की लक्ष्य आपल्या संसाराचे!
इतका बाका प्रसंग पण विठ्ठल वाट काढत काढत परिस्थितीशी तडजोड करीत करीत संसाराची धुरा सांभाळत होता.
हा प्रसंग होतो न होतो तोच् रस्त्यांवर पायी चालत असताना मुलगा निनाद चे अंगावर मागून गाडीने धडक दिली आणि त्याचे दोन्ही पाय निकामी झाले.
विठ्ठल आता डॉक्टरांच्या पायी पडणे तेवढे बाकी होते.
डॉक्टर काय होईल हो! होईल नं माझा निनाद बरा? त्याला चालता करा डॉक्टर, त्याला चालता करा! कातड्याचे जोडे करून पायात चढविन तुमच्या. पण माझा निनाद घरात बसला, तर संपलाच् की हो संसार माझा! विठ्ठल डॉक्टरांना विनविण्या करत होता.
डॉक्टर म्हणाले,”मी प्रयत्न करतोय पण त्याला खूप खर्च लागेल. Formal Shaft Fracture आहे. म्हणजे गाडी ने जर जोराने धडक दिली असेल तर त्याला Formal Shaft Fracture म्हणतात. अशा परिस्थितीत उपाय योजना फार तातडीने करावी लागते, तुमची परवानगी असेल तर पायात रॉड, प्लेट्स, स्क्रूज, नेलिंग अशा सर्व प्रकारची परवानगी द्या. एक्स रे दाखवतोय की दोन्ही गुडघे शाबूत आहेत आणि हिप बोन चे जॉईंट पण सुरक्षित आहेत. तो खर्च वाचला. असे समजा.”!
विठ्ठलाने काही विचार न करता संमती दिली कुठुन पैसा उभा केला, कसा पैसा उभा केला त्या विठ्ठलाला माहिती.
पण तासाभरात विठ्ठल आला, दवाखान्याचे तातडीचे पैसे जमा केले. सहा महिन्यात दोन चार प्रकारचे ऑपरेशन्स, physiotherapy आणि साधारण वर्ष भरात निनाद आपल्या पायावर चालायला लागला. पोराची तब्येत ठीक झाली पाहिजे म्हणून मायेनी झुरणारे, स्वतः तील स्वत्व विसरलेले विठ्ठल रखुमाई आणि त्यांना फक्त डबा चहा पोचविणे अशी मदत करू शकणारी भैरवी. विठ्ठल ची खुप ससेहोलपट होत होती. ऑफिस मग शहरी दवाखान्यात यायचे. रात्र रात्र निनाद च्या उशाशी घालवायची हॉस्पिटलमध्ये. मुक पणे अश्रू गाळायचे. मनातल्या मनात देवाला विनवण्या करायच्या. मग विठ्ठल, विठ्ठलाला आळवायचा,”विठ्ठला! हे काय वाट्टोळं चालवलया माझ्या संसाराचं! अरे काढ की रं बाहेर, ह्या सगळ्या तून निनाद ला चालव की रं पायावर! आत्तापासून पोरगं अपंग घरात बसलं तर बसलंच् की रे घर माझं! विठ्ठला, विठ्ठला मार्ग काढ रे बाबा!” मनातल्या मनात कुढत विठ्ठलाची विठ्ठलाचरणी आळवणी चालत असे. मग विठ्ठल मनातल्या अश्रूंना मनातल्या मनात वाट मोकळी करून देत असे. दिवसभर काम रात्री शहरी हॉस्पिटलमध्ये आणि परत सकाळी सकाळी ऑफिसमध्ये मग रात्रीचे काही काम पकडले होते ते झाले की रात्री शेवटच्या बसने शहरात हॉस्पिटलमध्ये. अशा फितुर चक्रात विठ्ठलाचा संसार अडकला होता. पोरामध्ये पित्याचा जीव असतो, पोरासाठी पित्याचं शरीर थकत नाही. परत दुसरा दिवस तेच् रहाटगाडगे पुनश्च हरि ओम!
सरकारी मदत,पीएफ, एफडी, होते नव्हते विकले वर पाच लाखाचे कर्ज एवढे सगळे निनाद साठी करुन विठ्ठल रखुमाई पुढल्या संसाराला तोंड द्यायला सज्ज झाले.
कर्जाचा डोंगर उतरवायचा म्हणजे विठ्ठल ने नौकरी सोबत संध्याकाळी एक चाकरी अजून धरली, सरकारी नोकरीच्या चाकोरीत चालत नसले तरी आता पर्याय नव्हता. पोरांना मोठे करायचे तर हे सर्व करावे लागणार. परत विठ्ठल कर्जाचे हप्ते फेडत फेडत संसार रेटत राहिला. काय सुंदर, चांगले देवू शकतो ते सर्व पोरांसाठी करत विठ्ठल छातीला माती लावित प्रारब्धाशी लढत होता. ह्या सगळ्या धावपळीत विठ्ठलाचे आपल्या प्रकृतीकडे कधी लक्ष दिले नाही.येणारा दिवस पोरांसाठी अहोरात्र मेहनत करण्यासाठी घालवलेला. केवढा प्रपंच – झालेले कर्ज फेडायचे, मुलं शिक्षणाची, म्हातारपणी राहायला घरासाठी, परत मुलीचे लग्न, निनाद चे लग्न चालली लिस्ट वाढायला….. एकटा जीव काय काय करणार? दिवसाला मर्यादा २४ तासांची तशीच् शरीराला मर्यादा असतेच् की हो! रखुमाई ला मात्र विठ्ठलाची काळजी लागून राहायची,
ती म्हणायची सुद्धा, “अहो किती जिवाचं रान करुन घ्याल? तुमच्या तब्येतीची काही खालवर झाल तर कोण येणार धावून? तुम्ही होता म्हणून मी पोरांच्या आजारात धडधाकट उभी राहिले. पण तुम्हाला काही झाले तर मी कुणाकडे बघायचे?”
त्यावर विठ्ठल लाडात येऊन म्हणायचा,”रखुमाई आपली चिंता विठ्ठलावर सोड. काय त्याच्या मनात, चांगलंच् करंल!” असे म्हणून विठ्ठल मुळ विषयाला बगल द्यायचा नी हळूच तिला कुशीत घ्यायचा.
मुले मोठी होत होती, भैरवी वयात आली. दिसायला सुंदर, चारचौघात उठून दिसणारी. तिच्या साठी सुंदर स्थळ आले तिचे लग्न लावून दिले. ती पती समवेत परदेशात निघून गली. आज तिचे देखील संपुर्ण कुटुंब आहे. एक मुलगा एक मुलगी. दोन्ही मुले हुशार. चांगला संसार सुखाचा सुरू आहे. चला एक काळजी मिटली.
तर निनाद ला देखील गावातील स्थळ मिळाले. लव्ह मॅरेज झाले. मुलगी खुप श्रीमंत माहेरून. त्यामानाने विठ्ठल रखुमाई अगदी तोकडे. मुलाच्या प्रेमाखातर विठ्ठल रखुमाई ने त्यांचा संसार लावुन दिला. निनाद, त्याची बायको, विठ्ठल, रखुमाई अशी सगळी मंडळी विठ्ठल ने घेतलेल्या तीन बेडरूम फ्लॅटमध्ये आलेले. आतातर विठ्ठलावर एवढ्या धावपळीत कर्जाचा डोंगर उभा झालेला. भैरवी, निनाद साठी घेतलेले कर्ज संपतेय न संपते तोच् भैरवी चे लग्न, त्यापाठोपाठ घरासाठी कर्ज, निनाद च्या लग्नासाठी कर्ज. कधी कधी असे वाटते ह्या रुढी परंपरा ह्यासाठी इतका पैसा आपण उगीच खर्च करतो. ह्या कर्जापोटी विठ्ठल आताशा परत रात्र रात्र पर्यंत काम करून पै पै जोडत कर्जाची परतफेड करत होता. निनाद ला काही एक न सांगता संसारासाठी मरमर मरत होता. स्वतः च्या प्रकृतीची काळजी न घेता. निनाद नी नमिता (निनादची बायको) सगळे खुश होते लग्नानंतर. विठ्ठल देखील सतत कामात व्यस्त होता नी घराचा डोलारा उभारत होता. त्याच्या रिटायर, निवृत्त होण्याने घरातील बरेचसे कर्ज उतरले होते पण विठ्ठल ला काम करण्याची इतकी सवय की त्याने परत पुर्ण वेळ नौकरीला वाहून घेतले. ह्या निर्णयावर मात्र रखुमाई चिडली. “अहो ऐकलंत का! निवृत्त झाला आहात, थोडेसे अष्टविनायकाची यात्रा करायला गेलो असतो म्हटलं” विठ्ठल पण म्हणायचा ,”काय ठेवलंय यात्रेत, पैसा खर्च होतो ना! त्यापेक्षा आपल्या घराला मंदिर समज अष्टविनायकाचे! एवढा चांगला मुलगा आहे, सुनबाई आहे. हे च् मंदिर की गं आपलं! शेवटी आपल्याला कोण साथ देणार! ही पोरंच् ना का येणाराय मंदिरातून तो गणपती धावत तुझ्यासाठी?” असे म्हटल्यावर रखुमाई ला गप्प बसण्याशिवाय पर्याय नसे. हो! संसारात आलेल्या अडचणींवर मात करीत विठ्ठलाने स्वतः च्या घराला मंदिर बनविले होते हे अगदी ठामपणे सांगू शकतो.
विठ्ठलाचा ही तोच् कामाचा रामरगाडा चालला असे. प्रकृतीकडे त्याचे बिलकुल लक्ष नव्हते. आज मात्र विठ्ठल खुशीत होता. आज सर्व प्रकारच्या कर्जातून त्याची सुटका झाली होती. आर्थिक कर्जाचा शेवटचा हप्ता भरला आणि विठ्ठल कर्जमुक्त झाला. म्हणतात ना की एकदा ध्येय निष्पन्न झाले की त्या ध्येय सांधत असताना प्रकृतीच्या कुरबुरींकडे लक्ष जात नाही. आणि शरीर देखील त्या ध्येयाप्रत पोचतपर्यंत उचल खात नाही पण एकदा का ध्येय पार पडले की त्या रिलॅक्स स्टेज मध्ये शरीरातील जुने आजार एकाएकी तोंड वर करतात. बस्सं! तसलाच प्रकार झाला आणि विठ्ठलाला अर्धांगवायूचा झटका आला नी विठ्ठल बेड रिडन झाला. कर्जमुक्त झाल्यावर लगेच दोन चार दिवसात विठ्ठलाने बिछाना पकडला तो कायमचा. संसारासाठी जन्मभर तन मन धन लावून संसार चालविला त्यात तनाने आता घात केला. संसारासाठी झटणारे शरीर आता अर्धे निश्चल झाले. बिछान्यावर विठ्ठल मनाने पार खचला. त्याच्यासाठी घरी दोन नर्सेस पण लावल्या ज्या रोजची साफ सफाई करणाऱ्या, त्याच्यावर देखरेख करणाऱ्या. घरात बेड रिडन रुग्ण असला की घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा कुजकट वास येतो, तशात विठ्ठल ला बेड सोर्स झालेले. असह्य दुखणे, खोलीभर रुग्णाचा असह्य वास. घरात कुरबुरी वाढायला लागल्या. त्यात परत दोन पैकी एका नर्स चा २४ तास राबता. ज्या विठ्ठलाने पोरांसाठी कष्ट करून देह झिजविला त्या देहाचे हाल कुणी पाहावत नव्हते. त्या देहामुळे घरामध्ये सतत ताणतणाव वाढत होता. रखुमाई बायको असलीतरी देहाला येणाऱ्या वासामुळे दिवसातून एक दोनदा भेटी दाखल बसत असे. प्रेमाचा हात फिरवत असे. बस् तोच् परिसस्पर्श विठ्ठलाला पुनर्जिवीत करीत असे. निनाद नमिताचे एक दोन बोल प्रेमाचे त्याला दिलासा देत असे आणि आला दिवस विठ्ठल साजरा करीत असे. पण हे चालणार कुठवर! पहिले चार महिने लोकांचे येणे, तब्येत बघणे, सगळे सोपस्कार झालेत. नव्याची नवी नवलाई विरली आणि मग त्या घरी सर्वांचे येणे हळूहळू बंद झाले. घरी सुद्धा सेवा करायची तर किती? घरच्यांची देखील सहनशीलता आताशा जवाब द्यायला लागलेली. नमिता चे माहेरी जाऊन राहणे वाढलेले, दिवस राहिले तिला, अशा रुग्ण असलेल्या वासात तिचा श्वास घुटमळायला लागला. आता अशा परिस्थितीत घरी नवी बाळ!
एक दिवस नमिता निनाद ला म्हणाली, “निनाद तू वाईट नको वाटुन घेऊ पण अशा घरात जिथे बेड रिडन रुग्ण आहे तिथे आपलं बाळ, बाळाचे संगोपन कसे होणार? त्याच्यासाठी घर कसे स्वच्छ हवे. निरोगी वाढीसाठी घर देखील निरोगी हवे. आपण विठ्ठल बाबांना वृद्धाश्रमात ठेवले तर? मी बोलून आले आहे जवळच्या वृद्धाश्रमात. आपण फक्त नर्सेस प्रत्येकी १५,००० रुपये प्रमाणे ३०,००० रुपये देतो. आणि वृद्धाश्रमात महिना जेवणखाण सुश्रुशेसहित २५,००० रुपये आहेत. त्यांची देखभाल पण चांगली होईल. बघ! फायद्याचा सौदा आहे”
निनाद ला देखील पटत होते पण मनातुन खटत होते. हिंमत नव्हती. आता मात्र नमिता ने जोर धरला. आपल्या बाळासाठी चांगले वातावरण मिळणार नसेल तर ऍबॉर्शन करावे लागेल ही धमकीवजा समजूत तिने रखुमाई आणि निनाद दोघांनाही घातली. आणि नमिताची नाळ जुळलेल्या नवीन बाळाखातिर होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. विठ्ठल बाबांचा देह संसाराचा गाडा रेटता रेटता आता काही कामाचा नव्हता. येणाऱ्या नवीन बाळाच्या आनंदात विठ्ठलाच्या भावनांना काही महत्व नव्हते. आता सगळी तयारी नवीन बाळासाठी.
आज निनाद, नमिता, रखुमाई खुशीत होते. बिछान्यावर पडल्या पडल्या विठ्ठल बातमीची वाट पाहात होता. त्याचे अर्धे शरीर सांगत होते की विठ्ठल खुशीत आहे.
निनाद म्हणाला विठ्ठलाला ,”बाबा पेढा भरवतो, तुम्हाला नातू झाला आहे.” तशाही स्थितीत विठ्ठलाने हात उचलला आशिर्वाद दिला, पेढा खाल्ला. एका डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. नातवाला बघण्याची अनावर इच्छा होती. विठ्ठल खुप खुशीत होता.
इकडे निनाद ने वृद्धाश्रमातील लोकांना घरी बोलावून ठेवले होते पण विठ्ठल बाबांच्या आनंदापायी त्यांना वृद्धाश्रमात नेण्याची बाब तो सांगू शकला नाही. अनभिज्ञ विठ्ठल मात्र प्रचंड आनंदात की घराला नवीन दिवा आला. केव्हा एकदा नातवाला बघतो असे झालेले. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे तीन दिवसात नवीन बाळ घरी येणार. विठ्ठल मनातले मांडे रचत होता तेवढ्यात बेल वाजली. वृद्धाश्रमाची टीम, त्यांचे डॉक्टर त्या अपंग, बेड रिडन विठ्ठलाला घ्यायला आली.
“ही मंडळी कोण रे निनाद?” विठ्ठलाने निनादला विचारले.
“बाबा! तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवतोय” निनाद ने भित भित उद्गार काढले.
एक असह्य वीज, एक झटका विठ्ठलाच्या अंगातून निघून गेला. त्याच्या बोबड्या अपंग तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले “वृद्धाश्रम”!
वृद्धाश्रमात न्यायला आलेल्या डॉक्टरांनी विठ्ठलाला तपासायला त्याची पल्स तपासायला हात हातात घेतला आणि निनाद ला म्हणाला, “He is no more”!

भाई देवघरे

Leave a Reply