तर उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल – अब्दुल सत्तार

मुंबई : ३ ऑगस्ट – पुण्यात मंगळवारी रात्री उशीरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौक येथे हा हल्ला झाला होता. या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. यावर माजी आमदार अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. पक्षाची, तत्वाची लढाई असेल तर ती जरुर लढावी. कदाचित आमच्या आमदारांवर असे हल्ले असतील तर नाईलाजाने त्यांच्या आमदारांवर आणि नेत्यावर हल्ले करावे लागतील. एकीकडून हल्ले होतील आणि दुसरीकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही, असं सत्तार यांनी म्हटलं.
या हल्ल्यामागील दोषी शोधून काढावे लागतील. दोषींवर कारवाई व्हायला हवी. या हल्ल्या मागे कोण आहे, हे पाहणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये अशा घटनांचा जनता निषेध करत असते, असंही सत्तार यांनी नमूद केलं. उदय सामंत यांची गाडी सिग्नलवर थांबली असताना हल्ला झाला. अशा घटना चित्रपटात पाहायला मिळतात. यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे नाहीत, असा सवालही सत्तार यांनी केला. लोकशाहीची लढाई लोकशाहीपद्धतीने लढावी, असा सल्लाही सत्तार यांनी दिली.
बबन थोरात यांच्या विधानावर कारवाई करण्यात येईल. उद्धवजींनी सांगितलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा इशारा सत्तार यांनी दिली. शेवटी पक्षाचा प्रमुख चिथावणी देऊन चुकीचे काम केल्यावर सत्कार करत असेल तर त्या घटनेमागे तेच आहे, हे सिद्ध होतं, असंही सत्तार यांनी नमूद केलं.

Leave a Reply