जखमी मादी बिबट्याची साकोली परिसरात दहशत

भंडारा : ३ ऑगस्ट – मागील आठवड्यात मोहघाटा जंगल शिवारामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट वन विभागाला सापडला नसल्यामुळे परिसरातील नागरिक या बिबट्याच्या दहशतीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा जंगल शिवारात वानराची शिकार करण्यात मग्न असलेला बिबट शिकारीच्या मार्गावर असताना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने या मादी बिबट्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे बिबट बेशुद्ध अवस्थेत असताना वन विभागाच्या कर्मचार्यांनी त्याला प्रथमोपचार करण्याच्या उद्देशाने वन विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी त्याला पकडण्याच्या प्रयत्न करतानी बिबट अचानक शुद्धीवर आला व त्याने वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा सानप हे जखमी झाले. तेव्हापासून जखमी बिबट सराटी, जांभळी, मोहघाटा, बामणी, बरडकिणी, मुंडीपार या परिसरात वावरत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाच्या वतीने या ग्रामपंचायतींमध्ये एकटे कुणीही जंगल परिसरात जाऊ नये असा सावधानीचा इशारा दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याला पकडून व उपचार करून दुसऱ्या घनदाट जंगलात सोडून द्यावे अशी परिसरातील लोकांनी मागणी केली आहे.

Leave a Reply