उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, सामंतांनी सांगितली आपबिती

पुणे : ३ ऑगस्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात मोठा राडा झाला. या राड्यानंतर उदय सामंत कोथरुड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सामंतांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मागचे काच पूर्णपणे फुटले आहेत. घटनेच्या वेळी प्रचंड मोठा राडा झाला. याच हल्ल्याचा थरार उदय सामंत यांनी सांगितला.
“माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला थांबल्यामुळे मी कुठेही घाई न करता थांबलेलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येवून थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस वॉलची स्टिक होती. तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते येवून समोरुन शिव्या घालत होते. तर दुसऱ्या बाजूला 50 ते 60 लोकांचा मॉब होता”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
“मी डाव्या बाजूला बघितलं, जेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होते त्यांच्या हातात सळई होते. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना शूटिंग करायला सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन गाडीवर चढून मारण्याचा प्रयत्न केला”, अशी धक्कादायक माहिती उदय सामंत यांनी दिली.
“शिवसैनिकांचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की, त्यांनी त्यांचा ताफा अडवला तर ते धादांत खोटं आहे. माझ्याकडे काही फोटो आहेत. हे फोटो मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतो. हातात बघा काय आहे. शिवसैनिक अशाप्रकारच्या सभांना हत्यारं घेवून जात असतील तर ती सभा म्हणावी का? हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलं पाहिजे”, असं उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते, शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी या प्रकरणावर तिकट प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसैनिकांचा रोष आहे, असं ते म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये रोष आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या समाचार घेण्यासाठी शिवसैवनिक सज्ज झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्व लोकांना अशाच प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. शिवसैनिकांचा हा हल्ला नाही तर त्यांची ही उत्सुर्त प्रतिक्रिया आहे. ज्यांनी गद्दारी केलीय त्यांच्याविरोधात असा रोष व्यक्त होणारच. आमच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा गद्दारांना धडा शिकवणताना कोणत्याही कारवाईला सामोरं जायला आम्ही तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया बबनराव थोरात यांनी दिली.

Leave a Reply