आता जगण्यासाठी शेती विकावी काय?- शेतकरी हवालदिल

नागपूर : ३ ऑगस्ट – अपुरे उत्पादन, खतांच्या दरात दुपटीने झालेली वाढ, मजुरी, तणनाशक, औषधे यांच्या दरातील वाढीने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिके अतिवृष्टीमुळे बुडाली. त्यात पुरेशी वीज मिळत नसल्याने होणारे नुकसान यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आता जगण्यासाठी शेती विकावी काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतीतून पुरेशा प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत नाही . शेतीमालाला बाजारपेठत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चांगला हतबल झाला आहे. जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या एका वर्षापासून सतत पशुखाद्यांच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. त्यामुळे दूध विक्री करणेही परवडत नाही. घरी गोधन असून ते आमच्या परिवाराचा एक भाग आहे. त्यांची सेवा करणे आणि ग्राहकांसोबतच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे सशक्तपणे ते व्यवसाय करीत आहेत.
गुणवत्ता आणि विश्वास हेच यशाचे गणित आहे. मात्र, शेतीमध्ये पुरेशा प्रमाणात भांडवल गुंतवणूक, पिकांना नसलेला भाव, अवकाळी पाऊस यासर्व कारणांमुळे शेती करावी का विकून टाकावी, अशा विदारक मनःस्थितीत शेतकरी आहेत.
वाढलेली मजुरी, सततचा पाऊस, रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेती करणे परवडत नाही. तरीही परंपरागत शेती करीत आहे. नफा-तोटा होत असतो. मात्र, गेल्या काही वर्षापासून शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेती विकून व्याजावरच जीवन जगावे, असे वाटत आहे.

  • छाया पडोळे, महिला शेतकरी
    ‘आम्हाले शेतीतून वर्षाकाठी किती पैसा भेटल अन् थो कवा भेटल याची काही ग्यारेंटी नाही.मंग आम्हाले बँकेने काउन उभे ठेवायचे? पावसाचा नेम नाही. बाजारभावाचा ठिकाणा नाही. सरकार देऊन देऊन पॅकेजची भीक देते. त्यापेक्षा आमच्या पिकांची आम्हाला किंमत ठरवू द्या.
  • हरिभाऊ, शेतकरी
    जून कोरडा गेल्याने पीक जळाले तर जूलै महिन्यातील अतिपावसामुळे उभी पिके बर्बाद झाली. कर्ज घेऊन बियाणे खरेदी केले.मजुरीवर मोठा खर्च झाला पण अतिवृष्टीने बहरात आलेले पीक खरडून गेले. त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न आता आमच्यासमोर आहे.
    -कृष्णा सांबारे, शेतकरी

Leave a Reply