स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही वर्धेतील ग्रामस्थांचे जगाशी संपर्क जोडण्याच्या विवंचनेत

वर्धा : २ ऑगस्ट – केंद्र व राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जात आहे. एकीकडे, विकासाचे प्रत्यंतर दाखविण्याचे पर्व आरंभ होत असताना, दुसरीकडे मात्र एका गावातील ग्रामस्थांना अजूनही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सरपंचासह काही गावकरी जगाशी संपर्क जोडण्याच्या कामात व्यस्त आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत या गावकऱ्यांची दैना विकासपर्व अद्याप दूर असल्याचं भीषण वास्तव मांडते.
समुद्रपूर तालुक्यातील ताडगावची ही व्यथा. चंद्रपूर व नागपूरच्या सीमेवर जंगलात वसलेल्या ताडगावचे दिडशेवर ग्रामस्थ शेतीसाठी नाला पार करतात. या लाल नाल्यातून नियमित पाणी प्रवाह सुरू असतोच आणि पूरस्थितीत दुथडी भरून पाणी वाहू लागल्यावर संपर्कच तुटतो. मार्गाचा अडथळा दूर करण्यासाठी आता पूर ओसरल्यावर गावकऱ्यांनी बांबुसेतूचे काम हाती घेतले आहे. सर्व गावकरी राबले. बांबूसेतू अखेर तयार झाला. जीवघेणी वाहतूक का असेना मार्गी लागल्याचे सरपंच विनायक श्रीरामे सांगतात. २०१५ साली पूल बांधून देण्याची मागणी तत्कालीन सरपंचांनी प्रशासनाकडे केली होती. आता सात वर्षे उलटत आहे. पण कोणीच काही बोलत नाही. असा जीवघेणा तरंगता प्रवास नाईलाज म्हणून करावा लागत असल्याचे श्रीरामे सांगतात.
सामाजिक कार्यकर्ते गजानन गारघाटे म्हणतात की, “आजारी वृद्ध, गर्भवती महिला यांच्यासाठी ही बाब जीवघेणी असल्याने लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. रामनाम घेत लंकेत जाण्यासाठी सेतू उभारण्यात आल्याची पौराणिक कथा आता क्षेपणास्त्राने अंतराळात झेपावण्याच्या युगात प्रत्यक्षात पहायला मिळणे, ही अमृत महोत्सवास लागलेली काळी किनार ठरावी.”

Leave a Reply