सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही? – मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

पुणे : २ ऑगस्ट – पुणे दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीक कर्ज, धरणातील पाणी, करोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती आणि बूस्टर डोस याबाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसंच मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सरकार संवेदनशून्य असल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पूर परिस्थितीमध्ये मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला. हेलिकॉप्टरही तयार ठेवले होते. त्याचा वापर करून जाणार होतो, मात्र पाऊस एवढा होता की हेलिकॉप्टर जाऊ शकत नव्हते. तरी आम्ही पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रस्त्याने जाऊन त्या परिस्थितीचा आढावा घेतला,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.
राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही? असा सवाल विरोधकांना विचारला आहे. ‘शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना थांबली होती. ती आम्ही कार्यान्वित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या,’ असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या योजनांमध्ये विलंब झाला आहे का, याचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकारशी संबंधित असलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्नांच्या यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा राज्याला झाला पाहिजे. त्यामुळे या योजनांचा आढावा घेतला आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील जी कामे थांबली असतील त्या कामांना गती देण्याचे काम केले जाणार आहे. विकास कामांचा थर्ड पार्टी ऑडिट करण्यावर भर असणार आहे. त्याबद्दल सूचना दिल्या आहेत. वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यातील कामांना कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही,’ असा खुलासाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Leave a Reply