सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

राज्यपालांचे Eye Opener

राज्यपाल कोश्यारींनी एक वक्तव्य केले त्याचा मतितार्थ असा की मुंबई मधुन गुजराती आणि मारवाडी माणसाला वगळले तर तुमची मुंबई आर्थिक दृष्ट्या शुन्य होते. माझ्या मते तरी एका दृष्टीने हे एक Eye Opener भाष्य आहे. आज मुंबईत बघितले तर औद्योगिक व्यवसाय, हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटल, कॉफीची चहाची दुकाने, अशी शृंखला जर घेतली तर मराठी माणूस कुठे उभा राहतो? Marathi Industrialists, Google केले एक वेब साईट एकुण ४५ नावे दाखवते. शंतनु किर्लोस्कर च्या नावाने श्रीगणेशा करणारी यादी डी.एस. कुळकर्णी वगैरे नावे घेत घेत शेवटी शेवटी नितीन गडकरी – मनोहर जोशी आणि शेवटी शिवाजी पाटील ह्या नावावर संपते. १२ कोटीच्या राज्यात ४५ उद्योजक. त्यात देखील शंतनु किर्लोस्कर ह्यांचे पंप आणि नाव दोन्ही झुक झूक करीत पंपाच्या आवाजाप्रमाणे कसेबसे तग धरून आहे. डी. एस.के गजाआड आहेत. बाकी मंडळी सर्वदूर जगभरात विखुरलेली तर काही राजकारणातील स्थानिक नावे – अजरामर नावे. ह्या नावांना आपली पिढी संपतपर्यंत तरी अजित पवार म्हणतात तसा अमर ताम्रपट घेऊन आलेली. डी.एस. के मराठी उद्योजक जसा बाहेरून पैसा आणून आणून बर्बाद झाला तसा राजकारण्यांना प्रश्न नसतो. त्यांचे प्रश्न उच्च स्तरावरचे असतात. पैसा गुंतवायचा कसा? काळ्याचा पांढरा करायचा असा? असे कदाचित राजकारण्यांचे मुद्दे असावेत.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना चार वर्षांत पायउतार का केले? तर असे म्हणतात की त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्या मदतीसाठी भूखंडांचे आरक्षण बदलण्याच्या आरोपांमुळे त्यांना पद सोडावे लागले. म्हणजे पक्ष कुठलाही असो, सत्तेत पदावर आले की पैसा, पॉवर पचवण्याची शक्ती लागते, नैतिकता लागते, सर्वसामान्य जनांचे भलं करण्याची आंतरिक इच्छा लागते ती आमच्या नेत्यांकडे नाही. म्हणजे मलाई चाटायची वेळ आली की सत्ताधारी राजकारणी चाटतील. पण एखाद्या मराठी माणसाला उद्योजक म्हणून उभे राहण्यास मदत नाही करणार! मग मराठी माणूस काय करणार? तर वडापाव ची गाडी लावणार, मंडईत भाजीचे दुकान लावणार. ते पण स्वतः च्या पैशाने. आपली उपजीविका निभावणार. शिवसेना काय देणार? महाराष्ट्र सरकार काय देणार? मराठी माणसाला??? ठेंगा!!!!!!!
निरपेक्ष सेवाभावानी सामान्य जनांची सेवा करायला सत्तेत मोदी जन्माला यावा लागतो.
आत्ता आपण बंगालची केस बघा! राज्य मंत्री महोदय पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहयोगी अर्पिता ५० करोड रुपये निघाले. ममता बाई तर दूर पळाली म्हणाली “ती मी नव्हेच”! हा एकूण घोळ २००० करोड चे आसपास जाणार म्हणताहेत.सामान्य माणसाला एक करोड जमविता जमविता जीवन संपून जाते पण करोड जमा होत नाही, करोड वर असणारे शुन्य मोजता मोजता डोक्यावरची टोपी उडून जाते. आणि राजकारणी बघा पाच वर्षात शत पिढ्यांची कमाई. गंमत म्हणजे सर्व राजकारणी ईडी ला शिवी घालणार. बाप्पेहो! ईडी आली की कोटी कोटी ची शेकोटी पेटते त्याचे काय?
सुशांत सिंग राजपूत – आयआयटी चा हुशार विद्यार्थी पण त्याला संधी मिळाली टीव्ही मालिका मध्ये येण्याची तर त्याने आयआयटी चे शिक्षण सोडले नी टीव्ही मालिका ते सिनेमा अशी कारकीर्द चालवली? का बरं सुशांत सिंग ने शिक्षण सोडले तर एकदा तुम्ही पैसा कमवायला लागला की पैसा कुठल्या पेशात जास्त! तो पेशा निवडतात. खरं म्हणजे आयआयटी मध्ये संधी मिळाली की लोकं देव पावला म्हणून शेवटपर्यंत कास धरून असतात. अगदी मरायला टेकताना सुद्धा प्रोफेशन सांगताना ताठ मानेनी मी आयआयटी चा विद्यार्थी म्हणून स्वतः स्टेटस सिम्बॉल समजतात पण सुशांत सिंग ह्या पलिकडे जाणून होता. आयआयटी मध्ये नंतर जास्तीत जास्त १करोड चे वार्षिक पॅकेज ते देखील ८-१० वर्षांनंतर तर टीव्ही मालिका, सिनेमा, मॉडेलिंग ह्यामध्ये एक करोड तर सहा महिन्यांत किंवा त्या आधी जमा होणार. परत तारांकित जीवन, प्रसिद्धी, ऐश्वर्य हा प्रकार ओघाओघाने.
तर सांगायचे तात्पर्य की मनुष्य एकदा प्रोफेशन मध्ये आला की त्याची प्राथमिक गरज पैसा जमा करण्याची वृत्ती असते. त्यातल्या त्यात राजकारणात असेल तर नेम, नियम, नितीमत्ता ठेवून फक्त सरकारी पगारावर उपजिविका करणारे तर नसतातंच्. अगदी नगण्य बोटावर मोजता येण्याइतपत. बाकी सगळे इमान से नंगे और हमाम मे नंगे! तर अहो मनोहर जोशी जिथे स्वार्थापोटी पायउतार झाले तर बाकी मंडळींची गोष्टच् सोडा.
आज काल सगळे राजकारणी घरोघरी जातात, खास करून मंत्री, आमदार ह्या लोकांकडे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे ह्या लोकांची भव्य घरे. ह्यांच्या एका हॉलमध्ये सामान्य गरीब मतदात्याचे संपुर्ण घर मावते शिवाय ग्राउंड फ्लोअर चा फ्लॅट असेल तर वर आंगण पण बाहेर निघते. म्हणजे पैसा असणारेच् आमदार होतात की आमदार झाल्यावर पैसे येतात हा पी.एच.डी.चा विषय असू शकतो.
आमचे गोंदियाचे प्रफुल्ल पटेल सरकारने ह्यांची मुंबई तील काही करोड ची मालमत्ता जप्त केली. अख्खा तिसरा माळा, चौथा माळा सरकारने गटकला म्हणजे जप्त केला. अरे एवढा पैसा येतो कसा? त्या जनतेचा – जी दोन वेळ पोटभर जेवायची भ्रांत आहे! आणि राजकारणी बंगल्यावर बंगले तर मजल्यावर मजले चढवताहेत.
माझ्या म्हणण्याचे तात्पर्य महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकारणी काय फक्त पैसा , जनतेचा पैसा हडपायला सत्तेत येतात का? आपले प्रातर्विधी पत्रकार परिषद पटू संजय राऊत – ह्यांची रसातळाला गेलेली नैतिकता! नाही मी त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोन क्लिप बद्दल बोलत नाही. ज्यात त्यांनी त्या बाईला आई बहिणीच्या शिव्याने न्हाऊ घातले वर परत भुखंड माझ्या नावाने करा म्हणून दमदाटी चालली आहे. तर सांगायचे तात्पर्य असे की ह्यांचे वक्तव्य आहे की केंद्र सरकार ईडी मागे लावून मराठी माणसाला पैसा कमावू देत नाही.! अशा प्रकारचे त्यांचे बेताल वक्तव्य आणि आमची मिडिया काही ही सवाल जवाब न करता षंढकृतीगत वृत्त वाहिन्यांवर प्रसारीत करते. अरे! मराठी माणसाला पैसा कमावू देत नाही म्हणजे अनैतिक मार्गाने पैसा कमवायचा आणि उलटा चोर…. ह्या संजय राऊत नावाच्या शिवसैनिकाला शर्म कशी नाही आली, असा पैसा कमवायची? मग भ्रष्टाचाराच्या एवढ्या पैशात शंभर शिवसैनिकांची घरे झाली असती, त्यांना उद्योगधंद्याच्या कामी लावता आले असते. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचे नाव झाले असते. पण संजय राऊतांनी अनैतिक मार्गाने कमाविलेला पैसा स्वतः च्या स्वार्थाकरीता वापरला. अशा वेळी शिवसेना, शिवसैनिक असे काही नसतं. फक्त आप्पलपोटा स्वार्थ असतो.
आता उद्धव ठाकऱ्यांच्या घरापर्यंत पोचलेली ईडी – त्यांच्या साळ्याला फायदा करून दिला म्हणून साळ्यापर्यंत पोचली. माझा सवाल हाच् आहे की सख्खा साळा का? एखादा शिवसैनिक किंवा एखादा मराठी शिवसैनिक उद्योजक ह्यांची नावे का समोर येत नाही, ईडी च्या बडग्यात! की off the track जाऊन सुद्धा काही शिवसैनिकांची घरं बांधून दिलीत किंवा एखादा उद्योग सुरू करुन दिला. अरे हा उद्धव ९० वर्षाच्या शिवसैनिक आजी कडे गेला तर ही आजी चाळीस वर्षांपासून कट्टर शिवसेनेत आहे पण घरी आमदनीचा स्त्रोत नाही. असे जगभर सांगत आहे. मग काय मिळाले ह्या शिवसैनिकांना? काय सगळे शिवसैनिक गुंड प्रवृत्तीचे आहेत? काय त्यांच्यात उद्योग सुरू करण्याचे साहस नाही की पैसा, जमीन नाही की स्वतः चा कुठचा व्यवसाय सुरू करावा म्हणून? खरे म्हणजे राजकारणी नेतृत्वाच्या वृत्तीत इच्छाबल नाही मराठी माणसाला “प्रगत” करण्याचं! ही खरी गोम आहे.
ह्याला कारण ह्या मंडळीना फक्त वेळ आली की शिवसैनिक किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते मुद्दा भडकवायला हवे असतात. पण जेव्हा वेळ मराठी शिवसैनिकाला फायदा करून देण्याची असते त्यावेळी हे स्वतः ची घरं भरतात.
जरंडेश्वर कारखाना आणि सहकारी बॅंका ह्यावेळी जेव्हा कर्ज वाटपाची वेळ येते तेव्हा आमचे राजकारण्यांना शंभर दोनशे चारशे कोटींचे कर्ज हातोहात मिळते, मात्र सामान्य माणसाला पन्नास हजारासाठी वणवण कागदं गोळा करीत फिरावे लागते. शेवटी चार महिन्यांनी त्याला सांगण्यात येते बापू! कर्जाची बंडी उलार! नाही मिळत. तर अशा धोरणापायी कुठुन मिळणार मराठी उद्योजक? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती मराठी उद्योगाला प्रेरणा दिली? किती उद्योग उभारलेत? किती मराठी उद्योगधंदे सुरू केले? वर त्यांचे आमदार त्यांना शिव्या देताहेत की जनकल्याणासाठी दिलेल्या निधीतून दहा टक्के पैशाची मागणी त्यांचे मंत्री गण करतात!
काल राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून सर्वच् क्षेत्रातील नेते मंडळींनी “मराठी अस्मिता” कार्यक्रम राबविला. पण. प्रत्यक्षात काय केले मराठी अस्मितेसाठी? तर प्रेस कॉन्फरन्सा बोलवू बोलवू मराठी अस्मिता डागाळल्या.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? “वेळ आली तर राज्यपाल भवनात घुसू” ! गोल टोपीची परस्ती करणारा हा माजी मंत्री. पण मुद्दा मिळाला मार चौका! अंधारे ताईच्या भाषणात मराठी माणसाला शिव्या घातल्या की टाळ्या पिटणारा आव्हाड मात्र मराठी अस्मितेचा डंका पिटतोय! काय लोकशाहीची लक्तरं लक्तरं करताय!
उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा रोख असा की राज्यपालांना कोल्हापूरी वहाणेने मारहाण करा, मग त्यांची उचलबांगडी करा. का करा! तर निर्णय न घेता येणारा राज्यपाल असा शिक्का मोर्तब झाला तर कोर्टाच्या चाललेल्या केसला तसूभर फायदा होवू शकतो. आणि अडीच वर्षे तुम्ही काय केले मराठी माणसासाठी? सचिन वाझे सारखा मराठी माणूस वसुलीकरीता वापरून गजाआड पाठविला? आणि आता गोंजारताय पत्रकार परिषदेत”मराठी अस्मितेला’!
राज ठाकरेंनी पण लगेच् बडगा उगारला. राज्यपालांनी इतिहास वगैरे वगैरे. राज साहेब तुम्ही गोष्टी सांगताय वेळ आली झाडून द्यायची! दोन चुलत भाऊ शिवसेनेत एक होवून टिकू शकला नाहीत. तुम्ही तरी काय इतिहास घडवला? जुन्या इतिहासाला गोंजारत बसताय नी सुपाऱ्या घेत सभा वाजवताय. दहा वर्षात एक आमदारकी. पण ज्ञान वाटायला निघाले म्होरं म्होरं! गंमतच् केली राज्यपालानी, सर्वायची टाळकुच् फिरविली.
अजित दादा आता विरोधी पक्षनेते झाल्यापासून लोकांना ज्ञानपाजू भुमिका वठवताहेत. पण ईडी ने ह्या अजित दादाच्या नातेवाईकांकडे धाड टाकली. अजितदादा थोडा थोडा पैसा काढत मराठी माणसाला उभा करता आला नसता का हो? पण नाही असे पैसा गुंतवायला आपल्या नात्यातील लोकं दिसले. भले करण्यासाठी.
ही सगळी राजकारणी मंडळी मिळून अब्जाधीश कदाचित त्यांचेवर संपत्ती असलेली जमात आहे. पण कुठल्या मराठी उद्योजकांसाठी नवा उद्योग चालू करून देतो म्हणून मदत केल्याचे बघितले आहे का?
खरे म्हणजे आपण लोकशाही म्हणतो पण आपल्याकडील लोकशाही ही खरी लोकशाही नव्हेच. मतं मिळविण्यासाठी आपापसात फूट पाडायची, जाती जातीत भांडणं लावायची, आरक्षणाची लाली दाखवायची, फुकट फुकट ची विज वाटायची, बस प्रवास फुकट करायचा, पाणी फ्री का तर “मतं” मिळवायची आहेत. हा सर्व प्रकार देशाला किती घातक आहे! पण कोणाला सोयरसुतक नाही. ह्यामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस.
ही नेते मंडळी राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास बघा म्हणतेय! काय पोरखेळ चालवला आहे. बघा! बघा! शिवसेनेचा इतिहास बघा! मग बोला! १९६६ सालापासून अस्तित्वात आलेल्या शिवसेनेने किती मराठी उद्योजक घडविले? ५६ वर्ष झाली? आणि उद्योजक शंतनु किर्लोस्कर पासून ते आजतागायत आकडा सांगतोय ४५ . ह्यात शिवसेनेचा फक्त एक उद्योजक ते देखील श्री मनोहर जोशी. ज्यांनी स्वतः भ्रष्टाचार केला म्हणून पायउतार झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस ने किती मराठी उद्योजक घडविले जे मुंबईचा आर्थिक भाराला हातभार लावू शकतील? एखादे नाव तर सुचवा! काय म्हणता? नाही सापडत! सापडेल कसे! मराठी माणसाला उभे करणे सोडा. ह्या पक्षाने सहकार क्षेत्राच्या नावाखाली मराठी माणसाचा भट्टा बसवला, चांगले चालत असणारे कारखाने बंद पाडले आणि निघाले अजित पवार कोश्यारींना ज्ञान पाजायला.
प्राप्त परिस्थितीत तुमच्याकडे काय योजना आहे जेणेकरून तुम्ही मराठी माणसाला औद्योगिक क्षेत्रात प्रगत करु शकता, त्याला आर्थिक बळ आणि मुख्य म्हणजे मार्केट उपलब्ध करून देवू शकता? अशा काही योजना नाहीत आणि मनोबल देखील नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांनी कानपिचक्या दिल्यावर राज्यपालांवर आगपाखड, दोषारोपण करणे म्हणजे बंदुक ताणून ढगात गोळ्या मारण्यासारखे आहे. ह्या उलट राज्यपालांच्या वक्तव्याला सकारात्मक दिशेने घेत शिंदे-फडणवीस जोडगोळीने मराठी उद्योजकांकरीता स्वतंत्र प्रयत्न करून पुढील दहा वर्षात मराठी उद्योजकांना मुंबई चा आर्थिक डोलारा सांभाळणारे मराठी उद्योजक द्यायचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून कुठलाही राज्यपाल मारवाडी, गुजराती बरोबर “मराठी” नाव घ्यायला बाध्य होईल. असे माझे प्रांजळ मत आहे.

भाई देवघरे

Leave a Reply