आगामी काळात प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात येईल, फक्त भाजप टिकेल – जे. पी. नड्डा

नवी दिल्ली : २ ऑगस्ट – देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजप टिकेल, असा दावा करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आह़े शिवसेनेसह अन्य प्रादेशिक पक्षांनी नड्डा यांना लक्ष्य केल़े
भाजप हा भक्कम वैचारिक पाया असलेला पक्ष असून हीच भूमिका कायम ठेवून मार्गक्रमण केले तर आगामी काळात प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही असून, या पक्षांशी भाजपला संघर्ष करावा लागेल, असेही नड्डा बिहारमधील भाजपच्या कार्यक्रमात म्हणाल़े भाजप हा वैचारिक पाया असलेला पक्ष आहे. वैचारिक पाठबळ नसते तर इतके मोठे राजकीय यश मिळाले नसत़े भाजपला आव्हान देईल, असा एकही राष्ट्रीय पक्ष टिकणार नाही. भाजपची लढाई वंशवाद आणि घराणेशाहीवाल्या पक्षांशी आहे. भाजपचा वैचारिक पाया इतका मजबूत आहे की, २०-३० वर्षे दुसऱ्या पक्षात राहून नेते-कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत, असे नड्डा म्हणाल़े
राज्या-राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष लोकांच्या आशा-आकांक्षांवर सत्तेत आले पण, नंतर घराणेशाहीवाले पक्ष बनले. द्रमुक, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, बिजू जनता दल, लोकदल हे सर्व प्रादेशिक पक्ष एकेका कुटुंबाकडून चालवले जात आहेत. भाजपला हे घराणेशाहीवाले पक्ष आणि वंशवाद अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. देशात लोकशाही व्यवस्था भक्कम करायची असेल तर भाजपला घराणेशाहीवाल्या पक्षांशी लढावे लागेल, असे नड्डा म्हणाले. भाजपची लढाई घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या पक्षांशी आहे. जम्मू-काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत आणि उत्तर प्रदेश-बिहार-पश्चिम बंगालपासून तेलंगणपर्यंत अनेक राज्यांमधील घराणेशाहीवाल्या पक्षांनी विकास आणि गरिबांच्या कल्याणाच्या मार्गात सातत्याने अडथळे आणले आहेत. आता या घराणेशाहीवाल्या पक्षांची दुरवस्था झालेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये २८७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. काँग्रेस भावा-बहिणीचा पक्ष झाला आहे. काँग्रेसने ४० वर्षे परिश्रम घेतले तरी भाजपला आव्हान देऊ शकणार नाही, असे नड्डा म्हणाले.
काँग्रेस पक्षाने कधीही प्रादेशिक आशा-आकांक्षा समजून घेतल्या नाहीत. एकेकाळी दक्षिण भारतात काँग्रेसची भक्कम पकड होती, आता दक्षिणेत काँग्रेस दिसतही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांमध्ये तमिळनाडूवर बोलतात. तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषा असल्याचे मोदी सांगतात, या भाषेचे महत्त्व पटवून देतात. संत कवी तिरुवल्लुवर यांचे संदेश वाचून दाखवतात. भाजप आता दक्षिण भारतातही यश मिळवू लागला आहे. आत्तापर्यंत ज्या दक्षिण राज्यांमध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही, तिथे नजिकच्या भविष्यात भाजप सत्ता मिळवेल, असा आशावाद नड्डा यांनी व्यक्त केला.
भाजप हा गाव, गरीब, शेतकरी, दलित, पीडित, शोषित, वंचित, मागास, आदिवासी, युवक, महिलांचा पक्ष आहे. विकास आणि जनकल्याण म्हणजेच भाजप. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणकारी सरकार स्थापन केले आहे, असेह नड्डा म्हणाले.

Leave a Reply