अभिनयाचे विद्यापिठ मीनाकुमारी – विकास पाटोळे

मीनाकुमारी ही एक अतिशय प्रतिभाशाली,बुद्धिमान , संवेदनशिल आणि अभिनयात पराकोटीची प्रगल्भ अभिनेत्री होती. ती कँमे-यसमोर उभी आहे आणि काही दृश्य साकारीत आहे किंवा संवाद म्हणत आहे असे कधी वाटतच नाही ईतकी सहजता अन्य अभिनेत्रींमध्ये क्वचितच दिसेल. ट्रँजेडीक्विन म्हणून जरी तिच्या कारकिर्दीकडे पाहीले जात असले तरीही ती साकारत असलेल्या कारुण्यमय भूमिका आणि ईतर अभिनेत्री साकारीत असलेल्या कारुण्यमय भूमिका यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.
मीनाकुमारी हिने “साहिब, बिबी और गुलाम ” मधील साकारलेली छोटी बहू तिने ईतकी जबरदस्त साकारली आहे की एवढी एकच भूमिका करुन जरी ती थांबली असती तरी कायम स्वरुपी अजरामर झाली असती. या भूमिकेला संपूर्ण देशात तर लोकप्रियता , मानसन्मान मिळालेच पण परदेशातही या भूमिकेचे खुपच कौतुक झाले होते. तिच्या सर्व भूमिका संपूर्णपणे भारतीय संस्कृती , परंपरा , आणि भारतीय स्रीचे प्रतिबिंबच असायचे. साहीब, बिबी और गुलाम हा चित्रपट परदेशात फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुरु असताना ती साकारीत असलेली छोटी बहू सर्वांना ईतकी आवडली की सर्व भारावून गेले होते. घरंदाज व कुलीन घराण्याची बहू असून सुद्धा केवळ नव-याने घराबाहेर जावून परस्री बरोबर मद्य घेवू नये म्हणून सर्व संस्कार बाजूला ठेवून नव-याला घरातच मद्य घेण्यास साथ देणारी आणि नव-याच्या आवडीसाठी मद्याला जवळ करणारी आणि त्यातच स्वतःचे जीवन संपवणारी छोटी बहू केवळ लाजबाबच होती. हा चित्रपट परदेशात फिल्म फेस्टीव्हलमध्ये सुरु असताना एक विदेशी महिला पत्रकार या छोट्या बहूचा हा रोल पाहून शेजारी बसलेल्या भारतीय पत्रकाराला अगदी सहज म्हणाली ” Why don’t she take Divorce ? ” आणि हे ऐकून भारतीय पत्रकाराच्या डोळ्यात मीनाकुमारीच्या अभिनयाला मिळालेल्या या पावतीने पाणीच आले. मीनाकुमारी ही महिला अभिनेत्रींमध्ये अभिनयाचे विद्यापिठच होती हे अगदी सत्य आहे.

विकास पाटोळे

Leave a Reply