तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार

गडचिरोली : २८ जुलै – राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सद्या विदर्भ दौऱ्यावर आहे. आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे म्हटले.
अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने घेण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. काल मी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांच्याकडे मी विविध मागण्या केल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, प्रत्यक्ष शेकतऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करावी. अशा परिस्थिती पाकमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची असते. असे महत्त्वाचे निर्णय दोघांनी मुंबईत बसून घेऊ नये, असेही ते म्हणाले.
संकटाच्या काळात सरकारने सामाजिक संघटना, प्रशासन, आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन काम करायचे असते, त्यातून चांगले निकाल येतात. मात्र, दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. आज शेतकरी हवालदील झाला आहे. त्यांना विजेचे कनेक्शन मिळत नाही. शेतात आजही पाणी भरले आहे, अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतासोबतच अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. आज मी नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे, असेही ते म्हणाले.
पावसामुळे गडचिरोलीतील २५ हजार हेक्टर शेतींचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाच्यावतीने वर्तवण्यात आला आहे. शेतीसोबतच अनेक शेतकऱ्यांच्या घरांनाही ओल आली आहे. ही ओल जशी कमी होईल. तशी या भींती पडण्याची भीती आहे. त्यामुळे पंचनामे करताना या शेतकऱ्यांचा समावेश त्यात करावा, अशी मागणी ही अजित पवार यांनी केली.

Leave a Reply