अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू

अकोला : २८ जुलै – हज यात्रेहून आलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अकोल्यातील हातरूण येथील दोघे नवरा-बायको हे दुचाकीने पहाटे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे रवाना झाले. मात्र, अचानक रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसल्याने त्यांनी अचानक आपल्या दुचाकीचे ब्रेक लावले. अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीचं संतुलन बिघडले हा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकी स्वार असलेली महिला हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालक हे जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आज गुरुवारी पहाटे अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या हातरूण गावात रहिवासी असलेल्या लुकमान खान (वय ५०) आणि त्यांच्या पत्नी तरन्नुम सहर (वय ४०) हे दोघेजण बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे रवाना झाले. हज यात्रेहून परतलेले हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना रस्त्यात असलेल्या शेगाव येथे थांबणार होते. दरम्यान, शेगाव-डोंगरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील ओंकार हॉटेलजवळ अगोदरच ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर तसाच पडून होता. यावेळी लुकमान खान आणि तरन्नुम सहर हे दुचाकीने जात असताना अचानक त्यांना हा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहून त्यांना अचानक धक्का बसला. त्यांनी आपल्या दुचाकीचे ब्रेक लावले.
अचानक लावलेल्या ब्रेकमुळे दुचाकीचे संतुलन बिघडले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी तरन्नुम सहर हे खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यात हलविण्यात आले. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर लुकमान खान यांना देखील मार लागल्याने ते जखमी झाले. सध्या त्यांच्यावर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरन्नुम सहर यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली आणि एक मुलगा आहे.

Leave a Reply