सेक्स रॅकेट चालवणारा मेघालयातील भाजप नेता अटकेत

शिलॉंग : २७ जुलै – मेघालयात नुकतंच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. मेघालयातील भाजपचा नेता बर्नार्ड एन. मारक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा फार्म हाउसमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. वेस्ट गारो हिल्स पोलिसांनी या फार्म हाऊसमधून सहा जणांची सुटका केली. यात अल्पवयीन असलेली चार मुले आणि दोन मुलींचा समावेश होता. या प्रकरणात आधीच 73 जणांना अटक झाली असून भाजप नेता बर्नार्ड फरार होता. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी हापूड येथून अटक केली आहे. त्याला मेघालय पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयातील भाजपचा नेता बर्नार्ड एन. मारक याच्या फार्म हाऊसवर मेघालय पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बर्नार्ड फरार होता. त्याला उत्तर प्रदेशमध्ये अटक झाली आहे. त्याला आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक तिथे जाणार असल्याचे मेघालयातील वेस्ट गारो हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितलं. बर्नार्डला मेघालय पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे हापुडचे पोलीस अधीक्षक दीपक भुकेर यांनीही म्हटलं आहे.
सेक्स रॅकेट उघड झाल्यानंतर मेघालय पोलिसांनी बर्नार्डविरुद्ध लूक आऊट नोटीस काढली होती. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील पिलखुवा पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या पथकाने गाझियाबादच्या सीमेवरील एका टोल प्लाझावर बर्नार्डच्या मुसक्या आवळल्या.
एका अल्पवयीन मुलीला तिच्या काही मित्रांनी मेघालयातील रिंपू बागान (Rimpu Bagan) या फार्महाऊसवर नेलं होतं. तिथे एक खोली भाड्याने घेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले गेल्याचे त्या पीडित मुलीने न्यायालयासमोर सांगितले होते. या फार्महाऊसमध्ये लहान 30 खोल्या होत्या. यापैकी एका खोलीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यानेही सांगितले. या प्रकरणात फेब्रुवारीत गुन्हा नोंद करण्यात आल्याचे त्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. एका आठवड्यातच अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम 366 ए नुसार (अल्पवयीन मुलीची खरेदी), 376 (बलात्कारासाठीची शिक्षा) आणि पॉक्सो कायद्यानुसार कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, सेक्स रॅकेटबद्दल बोलताना विवेकानंद सिंह म्हणाले की, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रिंपू बागान फार्म हाऊसवर छापा टाकला. रिंपू बागनची मालकी पूर्वाश्रमीचा गुन्हेगार आणि नंतर राजकीय नेता बनलेल्या बर्नार्डची होती. या फार्महाऊसवर सहाजण आढळले होते. यात चार अल्पवयीन मुले आणि दोन मुली होत्या. तसंच छापेमारीच्या वेळी तिथे दारूच्या 400 बाटल्या आणि 500 पेक्षा अधिक कंडोम सापडले होते. 27 वाहनं, 8 दुचाकी आणि क्रॉसबो आणि बाणही जप्त करण्यात आले. वेश्या व्यवसायासाठी मुलींना येथील खोलीत डांबण्यात आल्याचा आरोप होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply