भांडणात मध्यस्ती करायला गेलेल्या इसमाचा मारहाणीत मृत्यू

नागपूर : २७ जुलै – चौघांनी दारूचे सेवन केले आणि आपआपल्या घरी निघून गेले. दरम्यान एकाने दुसऱ्याला फोन करुन मला एकट्याला सोडून तू कसा काय निघून गेला अशी विचारणा करत वाद केला. हा वाद पुढे विकोपाला गेला आणि व्यक्ती याच्या घरी आपल्या अल्पवयीन भावासह त्याच्या घरी धडकला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारी भांडण सोडविण्यासाठी आला. मात्र आरोपीने त्याची कॉलर पकडून जोरात खाली पाडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पारडी पोलिस ठाणे परिसरात घडलेल्या घटनेत एका अल्पवयीनसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार अंबेनगर पारडी येथील रहिवासी मुकुंदा श्रीराम मते (वय 39), वीजय गुल्हाणे, युवराज वैद्य, गुड्डू निर्मलकर यांनी कळमना भागातील एका वाईन शॉपमधून दारू विकत घेतली. एका ठिकाणी बसून चौघांनी दारूचे सेवन केले. यानंतर मुकुंदा मते आपल्या घरी निघाला.
घरी पोहोचल्यावर आपला शेजारी नेमलाल गडे (वय 58) याच्यासोबत त्याने मासे शिजवणे सुरु केले. यादरम्यान गुड्डू निर्मलकर याने मुकुंदा ला फोन करुन तु मला एकटा सोडून कसा निघाला म्हणत वाद सुरु केला. तसेच थांब तुझ्या घरी येतो म्हणून धमकावले. काही वेळात गुड्डू आपल्या अल्पवयीन भावासह मुकुंदा मतेच्या घरी पोहोचला. दोघा भावांनी मतेच्या घरात घुसून कॉलर पकडून त्याला खाली पाडले.
या दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी नेमलाल गडे आला. त्याने दोघांचे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला मात्र गुड्डू ने नेमलालचीही कॉलर पकडली आणि खाली पाडले. यानंतर त्याच्या छातीवर लाथांनी मारणे सुरु केले आणि नंतर दोघेही बाईकवरुन पसार झाले. मुकुंदा ने खाली पडलेल्या नेमलालला बघितल्यावर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. दरम्यान डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply