बिबट्याला रेस्क्यू करायला गेलेला वनरक्षकच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

भंडारा : २७ जुलै – राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला रेस्क्यू करीत असताना बिबट्याने वनरक्षकावर हल्ला करत जंगलात पळ काढला. ही घटना आज संध्याकाळी साकोली-लाखनी महामार्गावरील मोहघाटा जंगलात घडली.
मोहघाटा महाराष्ट्र वन विकास महामंडळ रोपवाटिका जवळ संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास अज्ञात ट्रकची धडक लागून बिबट जखमी झाला. जखमी अवस्थेत पडलेल्या बिबट्याची माहिती मिळताच साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी जखमी असतानाही मादा बिबट्याने कृष्णा सानप यांचेवर हल्ला केला व लागून असलेल्या जंगलात निघून गेली. सध्या तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पाऊस संततधार असल्याने आणि अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान कृष्णा सानप यांना पुढील उपचाराकरिता भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. मोहघाटा परिसरातील जंगल हे नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वन्यजीव भ्रमंती मार्ग असून महामार्गावर वन्यजीवांना धोका होऊ नये यासाठी उपाययोजना मार्गाचे बांधकाम सुरू आहे. उप वनसंरक्षक राहुल गवई यांनी जखमी वनरक्षक यांची भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेतली.

Leave a Reply