मुंबई : २७ जुलै – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली.माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“चुका सगळीकडेच होत असतात. चुका कुटुंबात, व्यापारात, धंद्यात होतात. राकारणातही होत असतील. जे प्रश्न विचारत आहेत ते नगरसेवक पदापासून मंत्रिपदापर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा चार ते पाच वेळा अध्यक्ष होणं ही साधी गोष्ट नाही. यातूनच तुम्हाला बळ मिळाले आहे. यातूनच तुमची लालसा वाढली आहे. याच लालसेतून हा घाव घातलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली. माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले,” असे संजय राऊत म्हणाले.
“आपण ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच विश्वासघात करतो. विश्वासघात झाला म्हणजे विश्वास ठेवणे सोडून देता येत नाही. काम करताना सहकाऱ्यांवर, कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवावा लागतो. त्याशिवाय कुटुंब पुढे जात नाही. ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे त्याच्या अंतरंगात काय सुरु आहे, हे आपल्याला समजत नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरुच राहील,” असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना पक्ष संघटनेवरील आपले वर्चस्व येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा असे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंना दिले आहेत. या निर्देशानंतर उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना समर्थानाची शपथपत्रे देण्याचा आदेश दिला आहे.