नो पार्किंगमधल्या गाडीवरून हॉटेलच्या सुरक्षारक्षकांची वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, व्हिडीओ व्हायरल

नागपूर : २७ जुलै – नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याच्या वादातून एका हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने थेट वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर दोघांमध्ये हाता-पायी झाल्याची घटना नागपुरच्या सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौक परिसरात घडली आहे. या घटेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
नागपूरच्या सक्करदरा भागातील तिरंगा चौक परिसरात असलेल्या हॉटेल बाहेर रोडवर अवैध पद्धतीने दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलीस टोइंग व्हॅनच्या मदतीने गाडी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. सुरक्षा रक्षकाने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जोरदार वाद घातला. बघता-बघता प्रकरण हातापायीवर आले . तिथे उपस्थित नागरिकांनी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
हॉटेलच्या सुरक्षा राक्षकाने वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यापासून मज्जाव केला. एवढेचं नाही तर तो वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने देखील त्या सुरक्षा राक्षकाला प्रतिउत्तर दिल्याचे व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

Leave a Reply