नागपूर काँग्रेसचे संविधान चौकार सत्याग्रह आंदोलन तर युवक काँग्रेसने पेटवली गाडी

नागपूर : २६ जुलै – ईडीने कॉंग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नोटीस बजावली आणि रोज त्यांना ईडी कार्यालयात बोलावून त्रास दिला जात आहे. या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज देशभर आंदोलन केले.
मागील आठवड्यात ईडीच्या नागपुरातील कार्यालयावर धडक दिल्यानंतर आज कॉंग्रेसच्या नेत्यांनी संविधान चौकात सत्याग्रह आंदोलन केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना दुसरीकडे युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र हिंसक झाले आणि जीपीओ चौकात एक गाडी पेटवून दिली. यानंतर नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. पोलिसांचीही तारांबळ उडाली. थोड्याच वेळात पेटलेली गाडी विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांचे घर जीपीओ चौकातच आहे आणि त्यांच्या घरासमोरच आज ही घटना घडली.
दरम्यान युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते तेथे जोरदार घोषणाबाजी करीत होते. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्ते माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना याबाबत विचारले असता, हा आमचा आक्रोश आहे. भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विनाकारण त्रास देत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि त्यांनी गाडी जाळली. सोनिया गांधी कॅन्सर पेशंट आहे. तरीही दररोज ईडी कार्यालयात बोलावून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळेच आम्ही आज आक्रमक भूमिका घेतली, असे ते म्हणाले
माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी शिवाणी वडेट्टीवार यांना विचारले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न करीत आहे. या ना त्या कारणाने ईडी, सीबीआय आणि पोलिसांमार्फत आमच्या लोकांना त्रास दिला जात आहे. आता आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी गाडी पेटवून दिली. आमची सर्व आंदोलने दडपली जात आहेत. विरोधी पक्ष कुठे आहे, असा खोचक सवाल सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून विचारला जात आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी आज आम्ही आंदोलनादरम्यान गाडी पेटवून दिल्याचे शिवाणी वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Reply