आंदोलन करणारे राहुल गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : २६ जुलै – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनायकडून (ईडी) चौकशी सुरु असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. याआधी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी केली होती. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबणीवर गेली होती.
राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं होतं. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याविरोधात तसंच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी आंदोलन करत होते. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेलं.
पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचं राज्य आहे अशी टीका केली. पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली तेव्हा राहुल गांधी एकटेच होते. राहुल गांधींवर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरु होती.
दरम्यान दुसरीकडे ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याआधी एकदा सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली असून ही दुसऱी फेरी आहे. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधींदेखील ईडी कार्यालात पोहोचल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्याआधी राहुल गांधीदेखील तिथे पोहोचले होते

Leave a Reply