असे संकट असेल तर कुणीही सेफ व्हायचा प्रयत्न करेन – रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : २६ जुलै – शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी सोमवारी (२५ जुलै) दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचा दावा केला. आज (२६ जुलै) पुन्हा खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची भेटी घेतली. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. या पार्श्वभूमीवर शिंदे गटात जाण्यासाठी ईडीचा दबाव आहे का? असा प्रश्न खोतकरांना विचारण्यात आला. यावर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर त्याच गोष्टीचा ताण असल्याचं सूचक वक्तव्य केलं.
अर्जुन खोतकर म्हणाले, “सोमवारी (२५ जुलै) माझी आणि एकनाथ शिंदे यांची योगायोगाने भेट झाली. त्यानंतर आज रावसाहेब दानवेंकडे चहा-नाष्ट्यासाठी आलो. याचे वेगळे अर्थ कुणी काढू नये. मी दिल्लीला का आहे याची कारणं सर्वांना माहिती आहे. मी दिल्लीत का आहे याची माहिती माध्यमं काढू शकतात. कदाचित तोच ताण माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे.”
“या सर्व परिस्थितीत कुणीही माणूस विचार करेन. असं संकट असेल तर कुणीही सेफ व्हायचा प्रयत्न करेन. कुटुंबाचा व इतर गोष्टींचा खूप तणाव आहे. नाही त्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण केल्या जात आहेत. काय करणार?” असा हतबल प्रश्न अर्जुन खोतकर यांनी विचारला. तसेच मी या विषयावर जालन्याला केल्यावर सविस्तर बोलेल,” असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
“ज्यांना खूप दिलं तेच लोक गद्दारी करतात या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर अर्जुन खोतकर म्हणाले, “ज्यांनी पक्ष उभा केला त्यांच्या पक्षाची अशी स्थिती होत असेल तर त्यांना निश्चितपणे वेदना होणारच आहेत. त्यावर बोलणं त्यांचा अधिकार आहे,” असंही खोतकरांनी नमूद केलं.

Leave a Reply