संपादकीय संवाद – शिवसैनिकांकडून घेतलेली शपथपत्रे शिवसेना भवनातील रद्दी वाढवणारी तर ठरणार नाहीत ना?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लवकरच वाढदिवस आहे, या वाढदिवसाला निष्ठावंत शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ देऊ नयेत असे उद्धवपंतांनी सुचवले आहे. त्याऐवजी त्यांनी आगळीवेगळी भेट मागितली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसैनिक एकदा शाखेवर आला की तो शिवसेनेचाच होऊन जात असे. त्याच्या अंगात एकदा शिरलेला शिवसैनिक कायम अखेरपर्यंत संचारलेलाच राहत असे, कालांतराने परिस्थिती बदलली, एकेक करत शिवसैनिक दूर जाऊ लागले. अर्थात बाळासाहेबांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणत बाळासाहेबांनी दूर जाणाऱ्यांची संभावना केली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा करिष्माच असा होता, की ४ गेले तर १६ नवीन येत होते, नव्याने येणाऱ्याला नवी ताकद प्राप्त होत होती. म्हणूनच शिवसेनेतून फुटलेल्या छगन भुजबळांचा बाळा नांदगावकरसारख्या नवख्या शिवसैनिकाने दणदणीत पराभव केला होता.
२१व्या शतकात शिवसेनेची सूत्रे उद्धवपंतांच्या हाती आली. त्यावेळी लागोपाठ दोन मोठी बंडे झाली, नारायण राणे आणि मग राज ठाकरे असे दोघेही शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे उद्धवपंतांची चिंता वाढली मग शिवसैनिकाला नैतिक बंधनात गुंतवण्याचा हेतूने उद्धवपंतांनी शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाला शिवबंधन नावाचा गंडा बांधणे सुरु केले, अर्थात हे शिवबंधन म्हणजेही साधा दोराच होता, म्हटले तर त्याचे बंधन होते, अन्यथा तोडून फेकून देण्याचेच काम होते.
शिवबंधन बांधूनही महिनाभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली, त्यामुळे उद्धवपंत चांगलेच हादरले, त्यांनी सर्व शिल्लक शिवसैनिकांकडून आता शपथपत्रे लिहून घ्य्यायला सुरुवात केली आहे. या शपथपत्रात शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची खात्री मागण्यात आली आहे, असे कळते.
काल मुंबईत शिवसेनेच्या एका नव्या शाखा कार्यालयाचे उदघाटन झाले, त्यावेळी बोलतांना उद्धवपंतांनी मला या वाढदिवसाला फुले देऊ नका तर शिवसैनिकांच्या शपथपत्रांचे गठ्ठे भेट म्हणून द्या, अशी विनवणी केली. नवे शिवसैनिक जोडून त्यांचीही शपथपत्र गोळा करून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
आज समाजमाध्यमांवर एकाने प्रश्न उपस्थित केला आहे, की ही शपथपत्रे किती रुपयांचे मुद्रांकशुल्क देऊन केली जावी, तसेच ही शपथपत्रे नोंदणीकृत केली जावी काय? याचे उत्तर शिवसेना नेते काय देतात याची प्रतीक्षा आहे. मात्र या संदर्भात काही नवे प्रश्न उपस्थित होणार आहेत,
समजा एखाद्याने शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र दिले, आणि नंतर तो बदलला तर या शपथपत्राच्या आधारे त्याच्यावर कोणती कारवाई केली जाऊ शकेल काय. हा महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आम्ही सार्वजनिक आयुष्यात अनेकदा अश्या अनेक शपथा घेत असतो, दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या शपथा विसरून जातो, अश्यावेळी आमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, मग असे शपथपत्र देऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची कात्री दिली आणि तो सदस्य एकनिष्ठ राहिला नाही तर त्यावर उपाय काय? इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो, एकनिष्ठतेची व्याख्या काय ठरवायची ? शिवसेनेने एखादी व्याख्या ठरवलीही तरी तिला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते सध्या शिवसेनेच्या कथित बंडखोरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, या याचिकेवर युक्तिवाद करतांना शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या सर्व सदस्यांनी बंडखोरी केल्याचा दावा केला, त्यावेळी शिंदे गटाचे वकील ऍड, हरीश साळवे यांनी या सदस्यांनी शिवसेना सोडलेलीच नाही, मग बंडखोरीचा आरोप कसा असा प्रश्न उपस्थित केला, पक्षात राहून नेतृत्वबदलाची मागणी करणे ही बंडखोरी होत नाही असे त्यांनी ठासून सांगितले. आता यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते? हे यथावकाश कळेलच.
असाच प्रकार एकनिष्ठेच्या व्याख्येवरही होऊ शकतो. असे जर झाले, तर हे शपथपत्रांचे गठ्ठे म्हणजे शिवसेना भावनातली वाढणारी रद्दी ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत स्वतः उद्धवपंतही साशंक असतील फक्त काहीतरी नवा फंडा द्यायचा म्हणून हा प्रयोग केला असणार हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply