वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने शेतमजूर महिलेला चिरडले

भंडारा : २५ जुलै – शेतीचे कामं आवरून घरी परत जात असलेल्या शेतमजूर महिलेला वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाड़ी तुपकर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
माहितीनुसार, दिशा सुरेश कांबळे (वय 32 वर्ष राहणार मोगरा) असं मृतक महिलेचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. मुरमाडी/तूप परिसरातून चुलबंद नदी प्रवाहित होत असून पांढरी शुभ्र आणि बारीक वाळूची मागणी अधिक असल्याने तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून अधिकाऱ्याच्या नजरेतून वाचण्यासाठी वाळू तस्कर वेगाने गाडी चालवत असतात. यातून अपघात ही वाढले आहे. असाच प्रकार लाखनी येथे घडला असून पळसगाव येथील एका वाळू तस्कराचा मालकीचा ट्रॅक्टर अवैध रेती भरून भरधाव वेगाने मुरमाडी/तूप कडून मोगराकडे जात होता. त्याचवेळी रस्त्यावरून दिशा कांबळे या काम आवरून घरी परत येत होत्या. तेव्हा येणारा ट्रॅक्टर हा अचानक अनियंत्रित झाला आणि त्याने दिशा कांबळे यांना जोराची धडक दिली. टॅक्टरची धडक बसल्यानंतर दिशा कांबळे या खाली कोसळल्या, आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले होते संतप्त झालेल्या लोकांनी ट्रॅक्टरचालकाला पकडून ठेवलं होतं. या अपघाताची माहिती लाखनी पोलीस आणि लाखनीचे तहसीलदार यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखनी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतक महिलेस पतीसह दोन मुलं असा आप्तपरिवार आहे. या घटनेनंतर वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply