सारं नीट जमलं असं म्हणून सुस्कारा टाकला . आणि स्नेह नगरजवळ असलेल्या गावंडे लेआऊट मधे . श्याम बंड यांच्या नव्या को-या बंगल्यात राहायला आलो . तिथे नळ नव्हते . विहिर होती . खुप मोठं अंगण होतं म्हणजे घराला कंपाऊंड नव्हतं .
आल्या आल्या घरातून एक कुत्रा आला आमचं स्वागत करायला , आणि तिथेच राहू लागला . महालातील संघ कचेरी ते स्नेह नगर असं कितीतरी लांब मोकळ्या गावात जावं तसे गेलो होतो . पण बंगला स्वतंत्र होता शेजारी कुणी नव्हतं मागेही नव्हतं .
पण समोर मात्र नाईक नावाचं एक अत्यंत श्रीमंत कुटुंब राहात होतं . ते लोक आपल्यात खुप आनंदी होते . त्यांच्याकडे एकआणि कार ड्रायव्हर होता .
इथे आल्याचं ऑस्टीन ला पटलं नसावं . ती हट्टी मुलासासारखी कडूनच बसली . कडेवर घ्यावं आणि मुलानी कमरेवरून घसरून रस्त्यात बसावं तसं झालं. गाडी आली चालतच चार चाकांनी पण आता तर बेशुद्ध असल्यासारखी गप्पगार झाली .
आस्टीनला समोरच्या बाजूने हॅंडल मारायची सोय होती . हॅंडल घालून पंचवीस वेळा जरी फिरवलं तरी चालू होण्याचा किंचित ही आवाज यायचा नाही . शेवटी तिला मी, तीन लहान मुलं धक्का मारायला अंगणात यायची .
समोरचा नाईक परिवार हे पहात असायचा पण इलाज नव्हता . बरेचदा आस्टीनला .
मागे पुढे केलं की ती चालू व्हायची .
घामानी चिंब झालेली मुलं आणि हे , दोघांच्याही चेह-यावर जिंकल्याचा आनंद असायचा .
आता हे वारंवार घडत होतं .
“असं का होतंय?”
“गाडी थकलीय . आपणच सेकंड हॅंड घेतली . त्यात शिकणारे विद्यार्थी . कधी कधी गेअरही जाम होत होता .पण काहीही झालं तरी तिला चालणं आणि आपल्याला चालवणं भागच आहे . “
परिश्रमाने जेवढे निराश झाले नाहीत तितके हे परिस्थिती ने झाले . माझे आईवडील, बहिण आणि आम्ही पाच जणं . त्यात मुलांची फी . तिघं भाऊ आई वडिलांना खर्चाचे पैसे पाठवत होते. पण खर्च आता वाढता होता.
ह्यांचा थिअरी क्लास मेडिकल कॉलेज जवळ भाड्याने घेतलेल्या जागेत चांगला चालू लागला होता .
ऑस्टीन तिथेच ठेवायची तर रस्त्यावर बेवारशी ठेवावी लागणार होती . घरी ठेवावी तर रोजची दमछाक . आणि घरी ठेवून तिकडे ड्रायव्हिंग कसं शिकवता येणार होतं ?
कोणत्याच प्रश्नाला फारसं उत्तर नव्हतंच .
जसं आहे तसं करायचं एवढंच हाती होतं . आणि माझ्या लहान बहिणीचं लग्न ठरलं .
शहरापासून त्यावेळी गावंडे लेआऊट लांब नव्हतं पण सरावच नव्हता कुणाला. त्यातून ते श्रीमंत .आमची गाडी पण अशी , रोजच धक्के मारून, हॅंडल मारल्यावरच चालणारी. माझी बहिण सुंदर . डबल ग्रॅज्युएट . त्यांच्या घराला साजेशी .
एकदा आम्ही आमच्या गाडीने त्यांच्या घरी जायला निघालो . गाडी घरापर्यंत पोहचली आणि अक्षरशः मान टाकली तिने .
बहिणीचे सासरे म्हणाले
” ही गाडी आहे की काय आहे ?. इथवर आली आणि गप्पगार झाली, ह्यापेक्षा रिक्षा परवडली .”
मनातून गाडीला लाही वाईट वाटलं असावं.
नाही म्हटलं आपल्या तीव्र संवेदना तिच्यापर्यंत पोहोचत होत्याच.
आम्ही निघालो. सवयीने ह्यांनी गाडी स्टार्ट केली आणि काय आश्चर्य, गाडी स्टार्ट झाली . आम्ही आनंदात, तिलाच कुरवाळत तिच्या मांडीवर बसलो. आणि सफाईदार वळण घेऊन गाडीने निघून गेलो.
पण आता लक्षात आलं होतं. आता नविन गाडी घ्यायला हवी होती. पण कशी ?
पैशाशिवाय शक्य नव्हतं. आणि गाडी आता जास्तच लहरी झाली होती . मनात आलं तसं वागायची. कधी स्टार्ट व्हायची कधी नाही. तीन मुलं , सुनील, सुजीत आता विवेकानंद नगरच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत जात होती. एकूण पहाता, गाडी व्यतिरिक्त सर्व ठीक होते.
एक दिवस हे म्हणाले ,
” पोरांना आपल्या नाजुक हातांनी धक्का मारणं कठीण होतं, हॅंडल मी खूप मारूनही कधी गाडी स्टार्ट होत नाही तेव्हा ती मेडिकल कॉलेज जवळच्या आपल्या ड्रायव्हिंग स्कूल जवळ ठेवतो. म्हणजे विद्यार्थी पण मदत करतील. “
ह्यांनी एक दिवस गाडीला नेलं आणि मनातून एकटं एकटं वाटायला लागलं.रोजची तिची सवय. पण मनाला पटवलं.
एक दिवस, माझ्या काही कामासाठी मेडिकलच्या रोडवर गेले असतांनाच ऑफीस मधे गेले.
तर नुकताच थिअरी क्लास आटोपला होता. आणि चार पाच विद्यार्थी ऑस्टीनला धक्का मारत होते .
आता गाडीची बॅटरी डाउन झाली होती. तेवढ्यात एक बस आली. त्यातल्या एकानी ह्यांना आणि मुलांना खिडकीतून हात बाहेर काढून हल्ला.
बस निघून गेली. गाडी नाही तर नाही च् स्टार्ट झाली. घराचा खर्च, जागेची भांडं सारंच होतं. अशावेळी पाचशे रूपयांची बॅटरी घेणं परवडणारं नव्हतं .
थकून , हताश होऊन ते ऑफिस मधे मधे आले.
” हे लोखंड मला लाभी दिसत नाही. “
विद्यार्थी ऑफीस बाहेर उभे होते. ह्यांनी त्यांना सांगितलं ,
बॅटरी गेलीय. आणतो दोन चार दिवसात. तोवर तुम्हाला मी गाडी रिपेअर करायला शिकवतो. “
विद्यार्थी हसत निघून गेले. हे एका खूर्ची वर मी दुस-या खूर्ची वर शांत बसून होतो.
दुस-याच दिवशी सकाळी एक अनोळखी मुलगा घरी आला आणि त्याने दोन बॅटरी घेण्यासाठी हजार रुपये दिले. नाव विचारलं. त्याने सांगितलं तेव्हा ह्यांच्या लक्षात आलं की की काल गाडीला धक्का मारत असतांनाच त्यांचा एक विद्यार्थी बसमधून हात हलवत होता. बस क्षणभर थांबली होती आणि हे मुलांना म्हणाले होते, ” आता धक्का मारून उपयोग नाही, बॅटरीचा गेलीय.”
ते शब्द त्याने ऐकले असावेत. ते हजार पाहून ह्यांचे डोळे भरून आले. गरज होतीच. पुढे देता येईल ह्या भावनेने ह्यांनी ते पैसे स्विकारले.
पुढची काही वर्षे गेली. ह्यांना पैसे देणं जमलं नाही. पण मनात ते राहून गेलं होतं.
आणि पुढे बरे दिवस आले आणि ह्यांनी सव्याज ते पैसे त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी पाठवले आणि ह्यांनी मुक्त झाल्याचा नि: श्वास घेतला.
पण कसचं काय, तो स्वतः नागपूरला घरी आला आणि ते पैसे ह्यांच्या पायावर ठेवत म्हणाला
” सर ही गुरूदक्षिणा आहे . आज मी माझ्या पायावर उभा आहे तो तुमच्यामुळे.. मी हे पैसे घेणारे तर मला खूप वाईट वाटेल. “
आणखी कितीतरी तो बोलला.
नाईलाज झाला . दोघंही अत्यंत भारावले होते
काही काही ऋणं अशी असतात की ती फेडता येत नाही . त्या ऋणातच रहावं लागतं .
हा पूर्ण लेख लिही पर्यंत मी त्या विद्यार्थ्याचं नाव आठवत होते., काळाच्या ओघात , कितीतरी घटना , प्रसंग विस्मरणात गेले . स्थळ, काळ , वेळ आठवेनाशी झाली .
पण आठवलं त्यांचं नाव
“बाबूराव निचत”
आता पुढे….
शुभांगी भडभडे नागपूर