त्यामुळेच महाराष्ट्राचे प्रशासन ठप्प पडले – नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

नागपूर : २५ जुलै – आपले मुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जातात, सकाळचा नाश्‍ताही तेथेच करतात आणि दुपारी जेवायला मुंबईत येतात. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात प्रशासन ठप्प पडले असल्याची टिका नाना पटोले यांनी केली.
राज्यात सरकार अस्तित्वात येऊन आज २७ वा दिवस उजाडला. पण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही. सर्व विभाग रामभरोसे सुरू आहेत. कायदेशीर कचाट्यात सरकार सापडले आहे. राज्यपाल महोदयांची कृतीही संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिल्लीत आमची महाशक्ती बसून आहे आणि ते आमचं सर्वकाही करतील, असा विश्‍वास राज्यात सरकारमध्ये बसलेल्या दोघांना आहे. पण लोकशाहीमध्ये जनता ही महाशक्ती असते, ते कदाचित आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल.
मोदींचे सरकार देशभरात केंद्रीय तपास संस्थांचा दुरुपयोग करीत आहे, याचं प्रत्यंतर सातत्याने येत आहे. जे लोक आधी ईडीच्या रडारवर होते, मग नंतर भाजपमध्ये गेल्यावर ते लोक शुद्ध झाले. आता नॅशनल हेरॉल्ड पेपरच्या संदर्भाने कारवाई केली जात आहे. नॅशनल हेरॉल्डची स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका राहिली आहे. इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराची माहिती पोहोचवणारं वृत्तपत्र म्हणून नॅशनल हेरॉल्डने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले. एका वृत्तवाहिनीशा बोलताना पटोले म्हणाल स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यामध्ये सध्या सरकारमध्ये असलेल्या भाजपच्या लोकांचे काहीही योगदान नाही. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या खाणाखुणा मिटवून टाकायचा अयशस्वी प्रयत्न भाजप सरकार करत आहे. ईडीच्या चौकशीसंदर्भात प्रकृती ठीक नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना घरी येऊन चौकशी करावी, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली होती. पण तरीही मुद्दामहून त्रास देण्यासाठी त्यांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. उद्यासुद्धा त्यांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रात आणि देशभर सत्याग्रह आंदोलन गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने करीत आहोत.
महागाई, बेरोजगारी, नोटबंदी, जीएसटी, रुपया रोज घसरतो आहे, अग्नीपथ योजना आणून देशातील तरुणांच्या जीवनाशी जो खेळ केला जात आहे याला देशातील जनता विरोध करीत आहे आणि त्यापासून देशाचे लक्ष भरकटवण्यासाठी मोदी सरकार कॉंग्रेस नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातही भाजपप्रणित ईडी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. येवढेच काय तर त्यांना सामान्य जनतेशीही काळजी नाही. म्हणून जीवनावश्‍यक वस्तूंवर जीएसटी वाढवला, लहान मुलांसाठी आवश्‍यक असलेल्या दुधावरसुद्धा जीएसटी वाढवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केला. शेतीचे घरांचे मोठे नुकसान झाले. दररोज साधारणतः पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. त्यामुळे जनता वाऱ्यावर असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

Leave a Reply