तुम्ही चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडीन – यशोमती ठाकुरांचा व्हिडीओ व्हायरल

अमरावती : २५ जुलै – ‘तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही, तुम्ही चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडीन, लक्षात ठेवा’, अशा शब्दात माजी मंत्री आणि तिवसाच्या कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिका-यांना दम दिला आहे. या घटनेची चित्रफित सध्या प्रसारित झाली आहे. तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना यशोमती ठाकूर यांनी हा इशारा दिला आहे.
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आटोपल्यावर यशोमती ठाकूर या सर्वांसमक्ष संबंधित रस्त्याचे काम कुणाकडे आहे, अशी विचारणा करतात. तेव्हा एक अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्याकडे आहे, असे सांगतो. त्याचवेळी अधिका-यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे सांगतात. ‘मी एक रुपयाही घेत नाही, तुमच्याकडून ‘क्वालिटी’चे काम झाले नाही, तर डोके फोडीन लक्षात ठेवा’, असा इशारा त्या देतात.
तिवसा मतदार संघात सिमेंट रस्त्याचे बांधकाम, इमारतींची दुरूस्ती अशा अनेक विकासकामांचे भूमिपूजन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी एका कार्यक्रमात हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply