विदर्भात पुन्हा मुसळधार, अनेक जिल्ह्यात पुर परिस्थिती

नागपूर : २४ जुलै – दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील काही तालुके पुराच्या तडाख्यात सापडले असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या आठवडय़ात आणि या आठवडय़ात देखील मंगळवापर्यंत विदर्भात पूर होता. गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असतानाच पाऊस परतून आल्याने नदी परिसरातील नागरिकांना धडकी भरली आहे.
वर्धा जिल्हा मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा प्रभावित झाला आहे. हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला पूर आल्यामुळे अलमडोह ते अलीपूर रस्ता बंद झाला आहे. मनेरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने आर्वी ते तळेगाव हा अमरावती व नागपूरला जोडणारा राज्यमार्ग ठप्प पडला. भारसवाडा ते सुजातपूर, मोर्शी ते आष्टी हे मार्ग बंद पडले. वाघाडी नाल्याचे पाणी लहान आर्वी गावात शिरले. आष्टी तालुक्यातील साहूर नदीला पूर आला आहे.
चंद्रपूरमध्ये सतर्कतेचा इशारा..
चंद्रपूर जिल्ह्यातही इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर-मुल रस्ता चिचपल्ली गावाजवळ बंद आहे. दक्षिण गडचिरोलीतील नऊ रस्ते बंद करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे.
वर्धा, अमरावतीमधील धरणे भरली..
वर्धा जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पाच्या १९ दारांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा धरणासह सहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाचे १३, शहानूर मध्यम प्रकल्पाचे चार, चंद्रभागा प्रकल्पाचे तीन, पूर्णा प्रकल्पाचे दोन, सपन प्रकल्पाच्या चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा, अधरपूस प्रकल्पातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply