केरळनंतर दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण

नवी दिल्ली : २४ जुलै – करोनानंतर आता भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढताना दिसत आहे. केरळनंतर आता दिल्लीतही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. यानंतर भारतात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या चार वर गेली आहे. ३१ वर्षीय या रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मंकीपॉक्स बाधित या रुग्णाने कोणताही प्रवास केला नसून या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी १६ प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली असून त्यातील २ प्रयोगशाळा केरळमध्ये आहेत.
या अगोदर १४ जुलैला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर १८ जुलैला दुसरा आणि २२ जुलैला तिसरा असे तिनही मंकिपॉक्सचे रुग्ण केरळमध्येच आढळून आले होते. केरळनंतर आता या रोगाने देशाच्या राजधानीतही शिरकावा केला आहे. जगातील ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.
देशातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. तसेच ‘मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सुचनादेखील जारी करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच मृत किंवा जिवंत वन्य प्राण्यांचा संपर्क टाळावा. बुशमीट (घुशीसारखा दिसणारा प्राणी) खाणं किंवा तयार करणं टाळावं. याशिवाय आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली क्रीम अथवा लोशन यांसारखी उत्पादनं वापरु नये, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या केंद्रीय रोगनियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील ७४ देशांमध्ये मेपासून १६,००० हून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तथापि, केवळ आफ्रिकेतच मंकीपॉक्सच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मंकीपॉक्स विषाणूचा अतिघातक प्रकार प्रामुख्याने नायजेरिया आणि काँगोमध्ये फैलावत आहे.

Leave a Reply