मानव पृथ्वीवर कायम राहू शकत नाही, नवीन जागेचा शोध घेणे आवश्यक – डॉ. एस. सोमनाथ

नवी दिल्ली : २२ जुलै – मानव पृथ्वीवर कायम राहू शकत नाही, अशा परिस्थितीत नवीन जागेचा शोध घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली आहे. बंगळुरू येथे आयोजित ह्युमन स्पेस फ्लाइटसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी पृथ्वी आणि मानवाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ”मानव पृथ्वीवर कायम राहू शकत नाही, अशा परिस्थितीत मानला नवीन जागेचा शोध घेणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील मानवाचे जीवन अत्यंत मर्यादित आहे. जर मानवाने राहण्यासाठी नवीन जागा निवडली नाही तर एक ना एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत येईल” ते पुढे म्हणाले, ”डायनासोर बुद्धीमत्तेचा अभाव असल्याने मारले गेले. पण माणसाला बुद्धी आहे. माणूस नावाचा प्राणी हुशार आहे. त्यामुळे त्याला नवीन जागा शोधावी लागेल”
अंटार्क्टिकावर जगभरातील केंद्रे आहेत. भारताची तीन केंद्रेही येथे आहेत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत आपण चंद्रासारख्या भागांवर पाऊल ठेवले नाही, तर जगभरातील लोक आपल्याला तिथून हाकलून देतील, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्याचे १०० वर्षांपर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल. आम्ही फक्त गगनयानापर्यंत थांबणार नाही. भारतातील एक किंवा दोन अंतराळवीरदेखील जगातील मोठ्या अंतराळ मोहिमेचा भाग असावेत, अवकाश संशोधनात भारताचाही समावेश असावा, अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply