वारी

आज 3 महिने उलटून गेले. आपलं मूल हरवून. पोलिसांकडे खेटे घालून कंटाळलो. त्यांना काय पडलंय म्हणा..एका मतिमंद मुलाला शोधणं वेळ वाया घालवणंच जणू..! सोशल मिडियावर फोटो टाकूनही अडिच महिन्याचा काळ लोटला..लोकांनाही त्याचं अप्रूप नसावं..चांगला नॉर्मल मूल असतं तर लोकांनी मेसेज फॉरवर्ड केले असते.म्हणतील बरं झालं…! या विचारांनी डॉक्टरांच्या डोळ्याला पाणी आलं…!
डॉक्टर ठाकूर हे एम.डी.होते.एका मोठ्या हॉस्पिटलचे सेक्रेटरी होते.त्या हॉस्पिटल तर्फे दरवर्षी दहा;बारा डॉक्टर आषाढी वारीत वारक-यांसाठी पाठवले जात.एक अँब्युलन्सही.
डॉक्टर ठाकूरांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता..त्यांत बाळंतपणात पत्नी गेल्यावर ; मतिमंद पोर जन्मास आल्यानंतर सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडाला होता.वारी वगैरे तर वेळेचा अपव्यय वाटे.हा समाज देवाचं इतकं करतो.परंतु वृत्ती बदलत नाही.
आपल्या मुलाला समाजाने चेष्टेची गोष्ट केली आहे.कुणी त्याला जवळ घेत नाही. त्याला स्पर्श करणं पाप वाटतं..नजर बदलते..!
वारीत पाठवलेल्या डॉक्टर वर्गाची पाहणी करण्यासाठी हॉस्पिटल तर्फे ठाकूरांना सांगण्यात आलं.त्यांनी ते टाळलं मात्र परंतु जाऊन लगेच परतावं या विनंतीमुळे ते गेले.मुलगा घरी ठेवणं अवघड कारण केअरटेकर दोन दिवस येणार नव्हती..! एका दिवसाचा प्रश्न होता म्हणून ते त्याला सोबत घेऊन गेले..आणि वारीत जातांना तो हांत सोडून धांवत सुटला…आणि नंतर कळलं नाही कुठं गेला.त्यादिवशी सगळे शोधत राहिले.पोलिसही…पण सापडला नाही…!
त्यामुळे एकंदरच टिळे;माळा घालून विठ्ठल नाम घेणा-यांना माझ्या मुलाशी काय देणंघेणं असा विचार जास्तच आला..सगळं नाटक वाटू लागलं…….
आणि एक दिवस त्यांना फोन आला.
तुमचा मुलगा आमच्या गावी आहे.सोशल मिडियावर फोटो पाहिला.ओळख पटली..!
डॉक्टर तातडीने निघाले..निरा नदीच्या पासून वीस कि.मी.वर आंतील बाजूला ते खेडेगांव होतं.ज्यानं फोन केला तो वेशीवर येऊन थांबला होता.
श्रीरंग त्याचं नांव..! डॉक्टरांनी कार थांबवली.तो आंत बसला.डॉक्टर अधिरतेनं त्याला विचारत राहिले..मुलाबद्दल तो सांगत राहिला..
” तुमचं पोर सुरक्षित आहे काळजी करु नये.आमच्या गांवातील आबा पाटील आहेत.त्यांच्या घरी आहे तो..! घरात पांडुरंगाचं देऊळ आहे त्यांच्या ..तुमच्या पोरानं गावाला लै लळा लावलाय..! वारीत तुमचं पोर पाहिलं आबांनी.त्यांनी सगळीकडे चौकशी केली.पण आई;बापाचं ठाव लागला नाही. पोलिसांत कळवलं..पण नंतर आबा म्हणले पोराला दुस-याच्या स्वाधिन नको करायला.याची काळजी कोण घेणार. बरं 3;4 वर्षाचं पोर.त्याला काय समजत नाहीए..! आबा पूर्वी वारीला नेहमीच जात.पण दोन वर्ष झाली.ते नीरेला माऊलीच्या पादुकांना स्नान घालायला जातात व घरी येतात.वय झालंय नं “
” माझा मुलगा बरा आहे नं? ‘” डॉक्टरांना हाच प्रश्न महत्वाचा वाटला.
” हो..!”
तेवढ्यात कार आबांच्या घरापाशी आली..तिथं कीर्तनाचा कल्लोळ उठलेला..बरीच गर्दी होती..डॉक्टरांनी श्रीरंगाकडं पाहिलं..
“आज कार्तिकी एकादशी ” इतकंच तो म्हणाला.डॉक्टरांनी कपाळाला हांत लावला.माणसं सुधारणार नाहीत या हेतूनं..श्रीरंग त्यांच्या हाताला घरुन गर्दीच्या आंत गेला..! त्यानं बोट दाखवलं आणि जावा म्हणलं..डॉक्टरांनी समोर पाहिलं.
समोर आबा पाटील हाती एकतारी घेऊन बेदुंधपणे नाचत होते..आणि ठाकूरांचं पोर? त्याच्या कपाळी गंध..गळ्यात तुळशीमाळ..त्याला एकेकजण आपल्या खांद्यावर घेऊन नाचत होता..एकानंतर एक.डॉक्टरांच्या मनांत संमिश्र भाव दाटले. पोराला बघून आनंदही झालाच.मात्र ही काय चेष्टा लावलीय? त्याचं बुजगांवणं केलंय असंही वाटून गेलं…!
पण पोरांकडं लक्ष जाताच.विचार जणू थिजलेच..
तो अभंग म्हणत होता..!!
आणि तितक्यात “बोला ss पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम..!” गजर झाला.त्यानंही ऊच्चरवानं तो म्हणला..चेह-यावर आनंद दुथडीभरुन वहात होता..इतका आनंद डॉक्टरांनी कधीही पाहिला नव्हता त्याच्या चेह-यावर..!
त्याला एका स्टुलावर बसवलं गेलं.लोकं पांडुरंग नंतर आबांच्या पाया पडत होते..कुणी त्या पोराला जवळ घेत होतं.काही बायका त्याच्या कपाळांस ओठ लावत होत्या ..!!
डॉक्टरांच्या मनाचा डोह हिंदकळत राहिला..”आपल्या मुलाला आजवर कुणीच जवळ घेतलं नाही .उपेक्षेनं पाहिलं..तिथं आज सगळेजण त्याला खांद्यावर घेऊन नाचले ..आज जवळ घेताहेत..? डॉक्टर धांवतच पोराकडे गेले.त्याला घट्ट मिठी मारली त्यांनी..! आबांना नमस्कार केला आणि सगळंकाही सांगितलं..! आबांच्या डोळ्याला पाणी आलं ” पांडुरंगाची कृपा आहे म्हणूनच ही भेट..तुम्ही याला घेऊन जाणार म्हणून वाईट वाटतंय. पण पांडुरंगानंच याची सेवा करायची संधी आम्हाला दिली..पण तुम्ही जे म्हणला की कुणी श्रीरंग नामक व्यक्तीनं तुम्हाला कळवलं..त्या नावाची व्यक्ती गावात तर नाहीए ..! “
डॉक्टर म्हणले “अहो इथंच तर होता तो “
पण शोधूनही तो सापडला नाही…
आबांनी हांत जोडले..”तो पांडुरंगच “
डॉक्टरांचा विश्वास बसेना..त्यानं मुलाकडं पाहिलं. तो हसत म्हणाला,
” तुका म्हणे आम्हा आहे भरवसा विठ्ठल सरिसा चालताहे ” हे स्पष्ट शब्द ऐकून डॉक्टर कंपित झाले..
आबांकडं पाहिलं त्यांनी.आबा हसले..” बरेच अभंग शिकला मजकडून. गुणी आहे पोरगा ” डॉक्टरांच्या तोंडून एकच शब्द गेला..
“अशक्य ” डोळे भरुन वाहू लागले..
आपल्या मुलाला घट्ट अलिंगनात घेतलं…!!
तोंडातून अनाहूतपणे निघालं “माझा विठ्ठल “

लेखक अज्ञात…

समाजमाध्यमावरुन साभार…

Leave a Reply