मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कैद्याने केला दुसऱ्या कैद्यावर हल्ला

नागपूर : २१ जुलै – नागपूर मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका कैद्याने मोक्काचा आरोपी झुल्फीकार जब्बार गणी या दुसऱ्या कैद्यावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान (मिरा रोड, ठाणे) याला जुलै २००६ मध्ये मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नावेद खान आणि मोक्काचा आरोपी झुल्फीकार जब्बार गणी यांच्यात वाद झाला होता. नावेदने त्याला बघून घेण्याची धमकी दिली होती. बुधवारी सायंकाळी सात वाजता फाशी यार्डजवळ कोठडी क्रमांक चारमध्ये नावेदने दुपट्ट्यात दगड बांधून झुल्फीकारवर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. अन्य कैद्यांनी हस्तक्षेप करीत दोघांचे भांडण सोडविले. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी कारागृह अधीक्षक अनूप कुमरे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जेलरक्षकांच्या हलगर्दीपणामुळे कैदी वारंवार एकमेकांवर हल्ले करतात. कारागृहातील वातावरण बिघडले असून कैद्यांची सुरक्षा बिघडली आहे.

Leave a Reply