मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

मुंबई : २० जुलै – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडीने) मंगळवारी दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता.
याप्रकरणी ईडीने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली होती. पांडे यांची दिल्ली ईडीने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली.
संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास सुरू होता. १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले पांडे हे ३० जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले. पांडे यांनी २००१ साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती.
त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. या वेळी त्यांनी २००६ मध्ये कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. २०१० ते २०१५ या कालावधीत या कंपनीला एनएसई सव्र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता.

Leave a Reply