भंडाऱ्यात नदीत अडकलेल्या मासेमारी सुखरूप सुटका

भंडारा : २० जुलै – मासेमारी करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रात गेलेले मासेमार वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नदीच्या मधोमध अडकून पडले. जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळ गाठले. परंतु, रात्रीचा अंधार आणि पाणी अधिक असल्याने बचावकार्यात अडचण येत होती. तरीसुद्धा मासेमारांनी जिवाची बाजी लावत स्वत:च सुटका करुन घेत नदीकाठावर पोहोचले. हा प्रकार पवनी तालुक्यातील पाथरी येथील नदीपात्रात घडला.
गोसेखुर्द धरणाच्या बुडीत गावांच्या पहिल्या टप्प्यातील पाथरी हे गाव. या धरणाने सर्वात प्रथम याच गावाला आपल्या पोटात घेतले. या गावाचे पुनर्वसन झाले असले तरी गावातील ढिवर समाजबांधवांची शेती गेल्याने प्रकल्पात मासेमारी करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
१८ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातील रामा कांबळे, मंगेश मारबते, समीर कांबळी, अजय कांबळी, सुभाष मेर्शाम व पंकज मारबते हे सहा जण तीन डोंग्याच्या सहाय्याने मासेमारीकरीता प्रकल्पात गेले होते. मासेमारीदरम्यान नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने ते पाथरीपासून दीड किलोमीटर अंतरावरील तांबकावाळी बेटावर झाडाच्या सहाय्याने डोंग्याला बांधून थांबले होते. त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने संपर्कही होत नव्हता. ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबायांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, अड्याळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, सरपंच जयश्री रोडगे व तलाठय़ांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीचे ९.३0 वाजल्याने जिल्हा आपत्ती विभागाने उद्या सकाळी बोट टाकून मासेमारांना काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
रात्रीचा काळोख असल्याने व नदीच्या पात्रात पाणी प्रचंड असल्याने बचावकार्य करण्यास अडसर निर्माण झालेला होता. त्यामुळे आपत्ती विभागाने एसडीआरफची एक चमू पाचरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. परंतु, आपत्ती व्यवस्थापनाची मदत पोहचण्यापूर्वीच बेटावर अडकलेल्या मासेमारांनी एकजूट होऊन तिनही डोंग्यासह आज पहाटे तीन वाजता पाथरी घाट गाठले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
तथापि रात्रीलाच पाण्याची पातळी आणखी वाढली असती आणि या मासेमारांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर आपत्ती व्यवस्थापनाचा उपयोग तरी काय? अशा चर्चा आता गावात सुरू झाल्या आहेत.

Leave a Reply