खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सामील, घर व कार्यालयात वाढली पोलीस सुरक्षा

नागपूर : २० जुलै – शिवसेनेला अधिकृत जय महाराष्ट्र करून १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सातत्याने खासदार तुमाने यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. शुक्रवार आणि शनिवारी शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत दोन दिवस नागपूरमध्ये मुक्कामी होते. त्यांनादेखील तुमाने भेटले नव्हते. तेव्हापासून तुमाने शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
मंगळवारी तुमाने शिंदे गटात अधिकृतरित्या सामील झाले. यानंतर नागपुरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली. रामटेक लोकसभा मतदारसंघातून तुमाने दोनदा निवडून आले आहेत..
शिवसेना-भाजप युतीचा त्यांचा फायदा झाला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ मिळणार नाही, हे स्पष्टच होते. त्याचमुळे तुमाने यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्मथकांनी सर्व पातळींवरून फिल्डिंगला सुरुवात केली आहे. शिंदे यांचे सर्मथक विदर्भात दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकार्यांना शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या सदंर्भात नुकतीच उमरेड मार्गावरील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भातील पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आल्याचे समजते. शिंदे सर्मथकांचे सुमारे ५0 जणांचा गट विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेला आहे.

Leave a Reply