उद्योजकाने परिवारासह कारमध्ये पेटवून घेत केली आत्महत्या, सुदैवाने पत्नी व मुलगा बचावला

नागपूर : २० जुलै – आर्थिक विवंचनेतून एका उद्योजकाने कारमध्ये पेटवून घेत आत्महत्या केली तर कारमधील पत्नी व मुलाचाही संपविण्याचा प्रयत्न केला. त्या उद्योजकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बेलतरोडी हद्दीत खापरी पुनर्वसन परिसरात घडली. रामराव गोपालकृष्ण भट (६३) असे मृताचे नाव आहे तर पत्नी संगीता (५५) आणि मुलगा नंदन (२५) हे दोघे जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रामराव भट यांचे वेल्डिंग आणि नटबोल्टचे दुकान आहे. ते जयताळा परिसरात पत्नी संगीता आणि एकुलता मुलगा नंदन यांच्यासोबत राहत होते. अभियंता असलेला मुलगा नंदन हा वडिलांना कामात मदत करायचा. त्यांनी लेथ मशिनचे दुकान टाकण्यासाठी मोठे कर्ज घेतले होते. दरम्यान,व्यवसाय मंदावल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे भट कुटुंब आर्थिक चणचणीत सापडले. त्यावरून पत्नी संगीता ही पतीशी नेहमी वाद घालत होती. त्यामुळे रामराव हे त्रस्त झाले होते. आज भट कुटुंब कारने जेवायला वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये जात होते. रामराव यांच्या डोक्यात कुटुंबासह आत्महत्या करण्याचा विचार घोळत होता. त्यांनी लघुशंकेला जाण्याचा बहाणा करीत खापरी पुनर्वसनजवळ कार थांबवली. १० मिनिटानंतर ते परत आले. त्यांनी एक बाटली काढून त्यामधील औषधी प्राशन केली. त्यानंतर मुलगा व पत्नीला पिण्यास सांगितले. मात्र, दोघांनी पिण्यास नकार दिला. त्यांनी कारमध्ये ठेवलेली पेट्रोलची डबकी बाहेर काढली.
कारमध्ये पेट्रोल शिंपडले. तत्पूर्वी एक चिट्ठी बाहेर फेकली. मग आगपेटीची काडी लावून पेटवून घेतले. रामराव हे जळून कोळसा झाले. रामराव यांनी कारचे दरवाजे लॉक केले होते. त्यामुळे कुणालाही कारबाहेर पडता आले नाही. विलंबाने पोहचलेल्या अग्निशमन दलाने पेटत्या कारवर पाण्याचा मारा करीत आग विझवली. त्यामुळेच मायलेक सुदैवाने बचावले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
कर्जाच्या डोंगराचा उल्लेख
रामराव भट हे काही कंपन्यांना नट बोल्ट पुरवठा करीत होते. त्यांच्यावर लाखोंचे कर्ज होते. कर्जापोटी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यांनी चिट्ठीत केला आहे. आमच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही, तसेच बँकेचे व्यवहार बहिणीकडे सोपवत असल्याचेही लिहिल्याची माहिती आहे.

Leave a Reply