२००९ मध्येच शिवसेना- राष्ट्रवादी युती फायनल झाली होती- शिवाजी आढळराव पाटील यांचा गौप्यस्फोट

पुणे : १९ जुलै – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती, असा गौप्यस्फोट शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. आत्ताची महाआघाडी २००९ ला होणार होती. फक्त शिरूर लोकसभेमुळं ती अडली असेही आढळराव पाटलांनी म्हटले आहे. शिरूरमधील शिवसैनिकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय का घेतला याचे कारणही स्पष्ट केलं. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचा घणाघाती आरोपही यावेळी बोलताना आढळराव यांनी केला आहे.
आढळराव म्हणाले की, 2009 मध्येच शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. तसेच शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा असे संजय राऊतांनी मला सांगितले होते. त्यासाठीच उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावर आपली युतीची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी होणारी शरद पवारांची सभा रद्द करण्याची मागणी मी केली. मात्र, पवारांना कसं सांगणार असे राऊत म्हणाले. ही बाब बाळासाहेब ठाकरेंना सांगितली आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेल्याचे आढळराव पाटील म्हणाले. त्यामुळे आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009लाच झाली असती असे ते म्हणाले.
गेली 15 वर्षे मी खासदार राहिलो आणि केवळ एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानं दु:ख झाल्याचं ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आमचे आणि गुन्हे शिवसैनिकांवर दाखल होत होते. त्यावेळी याबाबत मी स्वतः याची कल्पना उद्धव ठाकरें देत होतो. त्यावेळी एकदाच अधिकारी माझ्यापर्यंत आले होते. मात्र, त्यानंतर यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Reply