भंगाराच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू एक जखमी

नागपूर : १९ जुलै – नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. गुड्डु भभूतलाल रतनेरे (वय 52, रा. उप्पलवाडी) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे. तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय, 19) असे जखमी झालेल्या मजूराचे नाव आहे. समीत याला दुर्गावती नगर येथील आयुष्मान रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नागपुरातील भंडारा रोडवरील कापसी गावात एक भंगाराचे गोदाम आहे. या गोदामातून पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्ब कटरने कापत असताना स्फोट झाला. या स्फोटात एक मजूर जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद वल्द अब्दुल अजीज यांचे पारडी पोलूस ठाण्याच्या हद्दीत भंगाराचे गोदाम आहे. अजीज यांनी पुलगाव येथील फॅक्टरीतून निकामी दारूगोळा लिलावात विकत घेतला होता. हा दारूगोळा कटरने कापून त्याचे पार्ट वेगळे करण्याचे काम या गोदामात केले जाते. दारूगोळा कटरने कापण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॉम्बशेलचा स्फोट झाला.
गोदाम शेजारील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिांनी गोदाम आणि सभोवतालचा परिसर सील केला आहे.

Leave a Reply