चंद्रपुरातील चिमूर शहराला पुराच्या पाण्याच्या वेढा

चंद्रपूर : १९ जुलै – मागील चोवीस तासांत चिमूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गांवात पाणी साचले असून एकूण 13 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील उमा नदी सातनाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन चिमूर शहरास पाण्याने वेढा दिला. ज्यात पेठ मोहल्ला, चावडी, खाती कामठा, मानीक नगर, क्रांती नगर, उप जिल्हा रुग्णालय व परीसरातील घरात पाणी घुसले. तसेच तालुक्यातील अनेक गांवाना पुरांचा फटका बसला आहे. तसेच नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव, शेडेगाव, गडपिपरी, खरकाडा, पिपंळनेरी, काग-सोनेगाव या गावांनाही पाण्याने वेढले आहे. प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने अनेक कुटूंबांना सुरक्षीतस्थळी हलविले. पुरग्रस्तांची तात्पुरत्या स्वरूपात शहिद बालाजी रायपुरकर सभागृह येथे व्यवस्था केल्याची माहीती नगर परीषद अधिक्षक प्रदिप रणखांब यांनी दिली.
चिमूर तालुक्यातील कवडशी, केसलापुर, अमरपुरी भान्सुली, सरडपार, चिखलापार, नेरी, नवतळा, कोटगाव, पांढरवानी, किटाळी (तुकुम), भिसी इत्यादी गावासह अनेक गावांना पुरांचा फटका बसला आहे. चिमूर तालुक्यातील जांभुळधाट, कोटगाव, नवतळा, चिमूर-नेरी, नेरी-शिवन, पायली, खडसंगी, मुरपार, मिनझरी, अमरपुरी,भान्सुली, चिमूर-भिसी हे मार्ग बंद झाले आहेत.
चिमूर नगर परीषदेचे अधिक्षक प्रदिप रणखांब, अभियंता राहुल रणदिवे यांनी पुढाकार घेऊन सोनेगाव बेगडे येथील ५, गांधी वार्ड येथील ५, खाती कामठा येथील १८ तथा गुरुदेव वार्ड येथील १३ स्त्री, पुरुष बालकांचे रेस्कु करून एकूण 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी पातळी ओलांडली आहे. शहरालगतचे इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे दीड मिटरने उघडले आहे. यामुळे इरई नदीची पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुराचे ताजे संकट चिमूर शहरातुन पुढे आले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. टेलिफोन एक्सचेंज, तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आता हे पाणी ओसरले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली, घूघुस-गडचांदूर येथे पुलाचे पाणी ओसरले असले तरी, तूर्तास हे पूल बंद ठेवण्यात आले आहे. याची पाहणी केल्यावर हे पूल सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply