बकुळीची फुलं : भाग ३८ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

स्वतः ड्रायव्हिंग शिकवायचे हे ह्यांच्या मनात पक्कं फसलं . आणि त्याच आठवड्यात   जाहिरात आली ती नागपूरला असलेल्या एकमेव ड्रायव्हिंग स्कूल ची .
आणि मग तर ह्यांनी अधिक उत्साहाने   सांगितलं आम्हा सर्वांना
” नाहीतरी मी ड्रायव्हिंग शिकवणार होतो आता मी स्कूल च काढू शकतो कारण नागपूरला गणेश ड्रायव्हिंग स्कूल शिवाय अजून तरी ड्रायव्हिंग स्कूल दुसरं नाही” दादांनी होकार दिला .  हे उत्साहात म्हणाले .
  “मी ड्रायव्हिंग शिकवण्या आधी त्यांचे थिअरी क्लासेस घेईन .”
   सारे उत्साहात . माझी बहिण आता कॉलेजात होती , माझा भाऊ इंजिनिअरिंग ला होता. तेही ह्या कल्पनेनी आनंदात होते .
आई काहीही बोलली नाही .  मग मीच म्हटलं
” हे सारे हवेतले मनोरे आहेत. आहे का गाडी आपल्याकडे? आणि तुमच्याकडे लायसन्स आहे हे खरं आहे. पण गाडी घ्यायला पैसे तरी कुठून आणायचे ? “
कधी नव्हे तर हे प्रथम बोलले.
“गाडी, गाडी काय करतेस ? येतील छप्पन गाड्या. गुरूदत्ताने माझ्या मनात टाकलंय ना , मग तोच पूर्ण करील सारं. बघ तू. “
” हे तर खुपचं झालं , असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी “
मनातून मला राग आला होता ,ते मात्र नेहमी सारखेच हसले. आणि दोनच दिवसांनी तरूण भारत मधे  एक जाहिरात होती .
“ऑस्टीन गाडी विकणे आहे”  ह्यांना कमालीचा आनंद झाला . हातात नव्हती दीड दमडी आणि पहात होते गाडी.
दादा म्हणाले
“एकदा दिलेल्या पत्यावर जाऊन पहायला काय हरकत आहे? कमी किंमतीत असेल तर…”
” तर काहीतरी प्रयत्न करता येईल . आईलाही मागेन. “
आणि अतीव उत्साहाने दादा आणि हे बाहेर पडणार इतक्यात ह्यांना आठवण झाली . ते घरात आले आणि म्हणाले.
” आज गुरूवार आहे , दत्ताचा वार आहे . मला साखर दे थोडी. आणि आपली त्रिमूर्ती कुठेय?
आपले दत्तगुरू गेलेत ज्ञान संपादनाला . त्यांच्या मातोश्री आपल्या समोर आहेत. दोघं नर्सरीत तर तर मोठा दुसरीत .  एकूण मातोश्रींच्या काही निरोप असेल तर कथन करावा .”
ते हसतच बाहेर पडले तसं मी देवाला मनात हात जोडले.
“अशक्य ते शक्य होईल का? तुझ्या भक्तीचं खरं पुण्य ह्यांच्या खाती जमा झालं असेल तर ते त्यांना  मिळू दे.”
सिव्हिल लाइन्स मधे कर्नल सोमण ह्यांची ती गाडी होती. एरवी सायकलने जाणारे हे आज सायकल रिक्षा करून निघाले होते.
सकाळी नऊ घ्या सुमारास बाहेर पडलेले ती दोघं बाराही वाजले तरी परतली नव्हती.
” चालत येतात की काय सिव्हिल लाइन्स मधून” ? एकच काय अनेक प्रश्न होते .
खिशात शंभराची नोटही नव्हती आणि गेले होते गाडी घ्यायला .तरीही ह्यांचा आत्मविश्वासपूर्ण चेहराही डोळ्यापुढे येत होता .
  साडे बारा झाले . आणि खालचा छोटा मुलगा धावतच दोन जिने चढून वर आला आणि म्हणाला .
” काकू, काका गाडीत बसून गाडी चालवत आले . “
विश्वास बसत नव्हता पण ठेवणं भाग होतं. धावतच आम्ही दोन जिने उतरून खाली आलो तर, दहाबारा मुलं गाडीजवळ जमा झाली होती . हे आनंदात उभे होते , दादाही विजयाची गाडीकडे पहात होते .
    ह्यांनी आणलेले पेढे अर्धा अर्धा सर्वांना दिला . घरमालक आणि त्यांचा परिवार बाहेर डोकावला .
मला गाडी कशी आली याची कथा ऐकायची होती. बराच वेळाने  दादा पुढे गेले की गेली आणि त्यांच्या मागोमाग हे प्रत्येक पायरी जग जिंकल्याचा आनंदात चढत होते.
जेवणाची आज कुणालाच घाई नव्हती.
  “काय झालं , कशी आणली गाडी ? ” माझा अधीर प्रश्न. हे तर बोलणार नव्हतेच . दादांनी सांगायला सुरुवात केली.
” त्यांचं नाव कर्नल सोमण. . काश्मीर वरून नुकतेच ते रिटायर्ड होऊन परतले होते. आता त्यांना नविन गाडी घ्यायची होती . म्हणून ही विकायला काढली होती” .
“मग पुढे?”
“आता दम तर घेऊ द्या” दादांनी लोटीतलं पाणी भांड्यात ओतलं तसं हेच म्हणाले,
.” मी सत्यवचनी आहे . मी खरं खरं सांगितलं , रिटायर्डमेंट का घेतली? भाड्याच्या घरातून सास-याकडे रहायला कसा आलो . आणि आज खिशात सत्तर रूपये आहेत त्यातले वीस रिक्षाला दिले .पण तरीही जाहिरात पाहून आलो .
माझी खूप ध्येयं आहेत . कदाचित ती गाठीशी निगडीत असावीत . पण का वाटलं आणि आलो यांचं उत्तर नाही. “
“मग पुढे?”
  ते म्हणाले.
” आपण दोघं मिलीटरीतले . नाश्त्याची सवय झालेली . चला आपण प्रथम नाश्ता घेऊन या “
.  आम्ही खूप नाही नाही म्हटलं पण त्यांनी ऐकलं नाही . त्यांची पत्नीही आग्रह करत होती . मग ते म्हणाले
” तुमचा प्रामाणिकपणा मला आवडला . ह्या  सेकंडहॅंड ऑस्टीन गाडीची  किंमत कमीत कमी तीन हजार आहे.  तुमच्या जवळ पैसे नाहीत , खुप परिश्रम करण्याची इच्छा ही दिसते आहे . तेव्हा  मी एक उपाय सुचवतो .
    ही गाडी घेऊन जा . मुलांना ट्रेनिंग द्या आणि  संध्याकाळी गाडी माझ्या कडे आणून द्या जसजसे पैसे  येतील , पूर्ण होतील , ही गाडी तुमच्याच नावे ट्रान्स्फर करीन . पण सकाळी न्यायची , संध्याकाळी आणायची . सत्यवचनी आहात त्यावर माझा विश्वास आहे. आज गाडी घरी न्या , सर्वांना त्यातून फिरवा आणि परत आणा  विद्यार्थी जमवा. . पण गाडीचा पेट्रोल सारं तुमचं .आज मी भरलंय , आठ दिवस पुरेल.”
  आणि ह्यांनी होकार दिला. त्याबरोबर घरात जाऊन कर्नल सोमण नी सफरचंदाची एक करंडी आणून ह्यांना शुभेच्छा देत भेट दिली.
सारं ऐकताना न पाहिलेल्या देव माणसाचे मी मनोमन आभार मानले. डोळ्यातून नकळत आलेलं पाणी पुसलं.
   आज खरंच देवच अवतरला होता. आजही ही माणसं आहेतच. फक्त आपण तिथवर पोहचत नाही एवढंच.
आता पुढे….

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply