नागपुरात पावसाची रिपरिप पुन्हा सुरु, जनजीवन विस्कळीत

नागपूर : १८ जुलै – आठवडाभराहून अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या पावसापासून उसंत मिळण्याची हवामान खात्याने वर्तवलेली आशा फोल ठरली. रविवारीही पावसाची रिपरीप सुरूच होती. त्यामुळे नागपूरकरांचा या महिन्यातील दुसरा रविवारही घरीच गेला.
सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कायम होता. त्यामुळे पुन्हा एकदा काही ठिकाणी पाणी साचल्याने यातून मार्ग काढताना वाहतुकीची कोंडी झालेली दिसली. दरम्यान, कुठल्याही वस्त्यांमध्ये पाणी न शिरल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.
शनिवारी पावसाने काहीशी उसंत दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर साचलेले पाणीही कमी झाले होते. पावसाने उघाड दिला असला तरी ढगाळ वातावरण कायम होते. आठवडाभरानंतर पाऊस थांबल्याने रविवार काहीसा दिलासादायक ठरेल, अशी आशा होती. मात्र, सकाळी ८ वाजतापासून सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत जोर कायम होता. दिवसभर सरी बरसतच राहिल्याने रस्त्यावर, विशेषत: खड्ड्यामध्ये पुन्हा एकदा पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना यातून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागली. दिवसभर पाऊस कायम असल्याने एरवीच्या रविवारच्या तुलनेत रस्ते, बाजारपेठा, हॉटेल, रेस्टारंटमधील गर्दीही कमी होती.

Leave a Reply