कुत्र्याच्या पायाला दगड बांधून पाण्यात फेकले, व्हिडीओ व्हायरल, सुदैवाने बचावला कुत्रा

चंद्रपूर : १८ जुलै – भटक्या कुत्र्याच्या शेपटीला कधी फटाके लावणे, होळीमध्ये विनाकारण कुत्र्यांना रंग लावण्याचे प्रकार आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिले असतील. मात्र, चंद्रपूरमध्ये एका कुत्र्याच्या मानेला दगड बांधून पाण्यात फेकण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दगड निसटला आणि कुत्र्याने सुटका करून घेतली.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातली असल्याचे समोर आले आहे. काही तरुण हे गावातील एका नाल्याजवळ बसलेले होते. यावेळी या टोळक्याने एका कुत्राला पकडून धरले होते. या टोळक्यातील दोन तरुणांनी कुत्र्याच्या मानेला एक दोरी बांधली. त्यानंतर त्याच्या पोटालाही एक दोरी बांधली. या दोरीला भलामोठा दगड बांधण्यात आला. तोपर्यंत एक तरुणाने कुत्र्याला पाठीमागून धरून ठेवले होते. आपल्याला दोरीने बांधत असल्याचे पाहून कुत्र्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, या तरुणाने त्याला पुन्हा खेचून आणले. त्यानंतर मानेशी आणि पोटाशी दोरी बांधली आणि दगड बांधून कुत्र्याला पाण्यात फेकून दिले. संतापजनक म्हणजे हे कृत्य नाल्याच्या काठाशी बसून असलेले सर्वजण ते कौतुकाने बघत आहेत. कुत्र्याला या प्रकाराची कल्पना आल्याने त्याने प्रतिकार करण्याचा केलेला प्रयत्नही व्हिडिओत चित्रीत झाला. दगड बांधून पाण्यात फेकून निर्दयतेने त्याची मौज घेतल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.
मात्र पाण्यात पडल्यानंतर सुदैवाने दगड निसटला त्यामुळे हा प्रकार फसल्याने कुत्रा पाण्यातून बाहेर आला आणि त्याने जीव वाचवून घटनास्थळावरून धूम ठोकली. हा सगळा प्रताप मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातआहे.

Leave a Reply