सारांश – ल त्र्यं.जोशी

पराभूत राजकारणाचा आणखी एक पराभव पवार फडणवीस पर्व

उत्तरार्ध

राष्ट्रवादी काॅग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पराभूत राजकारणामधील सर्वात महत्वाचे पर्व म्हणून 2014 ते 2022 पर्यंत झालेला व कदाचित यापुढेही चालणारा पवार फडणवीस संघर्ष याला फार महत्वाचे स्थान आहे.वास्तविक या दोन नेत्यांमध्ये एका पिढीचे अंतर निश्चितच असल्यामुळे हा संघर्ष होण्याचे कारण नाही.शरद पवार जेव्हा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे पिताश्री स्व.गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते व योगायोग असता तर त्यावेळी ते मंत्रीही झाले असते.पण नियतीची इच्छा काही वेगळीच असावी.त्यामुळे पवार फडणवीस संघर्ष झाला असावा.
खरे तर असा संघर्ष होण्याचे कारण नाही.एका पिढीच्या अंतरामुळे ते दोघेही सत्तेच्या राजकारणात असले तरी त्यांचे प्राधान्यक्रम निश्चितच वेगळे असायला हवे होते.पवार राष्ट्रीय राजकारणात तर देवेंद्र राज्याच्या राजकारणात अशी विभागणी होऊ शकली असती.पण महाराष्ट्राचे राजकारण हेच पवारांच्या राजकारणाचे शक्तिस्थळ असल्याने व फडणविसांच्या पक्षानेही तेच त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केल्याने हा संघर्ष अटळ ठरला असावा.
तसे पाहिले तर देवेंद्र फडणविसांच्या मनात पवारांविषयी आदराचीच भावना असावी.त्यांनी त्यांचा कधी अधिक्षेप वा अनादर केल्याची घटना मला तरी आठवत नाही.उलट त्या आदराच्या भावनेची फडणविसांनी राजशिष्टाचाराला बाजूला सारून जपणूक केल्याची माझी माहिती आहे.कारण फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्याचे माजी अर्थमंत्री व विधानसभाध्यक्ष बॅ.शेषराव वानखेडे यांच्यावर माझे सहकारी सुधीर पाठक यानी तयार केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते दोघे एकत्र होते.अशा कार्यक्रमाचा एक शिष्टाचार असा आहे की, ज्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतात तेव्हा त्यांच्या भाषणानंतर कुणाचेही भाषण होऊ शकत नाही. त्या न्यायाने त्या समारंभातही देवेंद्रजींचे भाषण शेवटी अपेक्षित होते.पण कार्यक्रमाच्या संयोजकांनी नियोजित कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचे भाषण शेवटी होईल असे नमूद केले होते.ते वाचून स्वतः पवारांनी प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांचेच भाषण शेवटी होईल असा आग्रह धरला व तडीसही नेला.समारंभस्थळी व्यासफीठावर स्थान ग्रहण करताना त्या दोघांमध्ये ‘ पहले आप, पहले आप ‘ चा प्रयोग झालाच. 2014 ते 2022 या काळात मात्र दोघांच्याही वागण्यात ते सौहार्द आढळले नाही.उलट फडणविसांनी शरद पवार यांच्या राजकारणाचा विरोध सुरू ठेवला आणि 2019नंतर तो अधिक तीव्र केला. संधी मिळाली तेव्हा पवारांनीही फडणविसांचा दुस्वासच केल्याच्या काही घटना आहेत.त्यातील एकीचा उल्लेख पुरेसा आहे.नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या मार्फत कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराजांच्या घराण्यातील राजे संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर मनोनीत केले तेव्हाची शरद पवारांची प्रतिक्रिया त्यांच्या दर्जाच्या नेत्याला साजेशी मात्र नव्हती.’ एके काळी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करीत असत, आता पेशव्यानी छत्रपतींची नियुक्ती करण्याचा काळ आला आहे ‘ अशा आशयाची ती प्रतिक्रिया होती.त्यावरून पवारांना काय सुचवायचे होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.कदाचित राज ठाकरे यांनी ते अधिक स्पष्टपणे सांगितले आहे.अर्थात याचा अर्थ असा नाही की, पवार फडणविसांचा दुस्वासच करीत असतील. पण तो न करण्याची वा त्या दोघांच्या संबंधातील माधुर्याची नितीन गडकरींसारखी उदाहरणे पब्लिक डोमेनमध्ये तरी नाहीत.ते नसणे तसे अस्वाभाविक नाहीच.कारण काहीही म्हटले तरी ते दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय विचारांचे प्रतिनिधित्व करतात.त्यामुळे त्यांच्यात शह काटशह चालणारच हे गृहीत धरले पाहिजे.त्यामुळेच 2014 ते 2022 या काळात त्यांच्यात राजकीय संघर्ष झाला असेल तर त्यात काहीच आक्षेपार्ह नाही.उलट ते स्वाभाविकच आहे.पण नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे त्यात तूर्त तरी शरद पवार यांच्या राजकारणाचा पराभव झाला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
वास्तविक शरद पवारांनी फडणविसांचा विरोध करण्याला काही विशेष कारण नाही.उलट 2014मध्ये देवेंद्रजी शरद पवारांमुळेच मुख्यमंत्री होऊ शकले. कारण त्या निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. अर्थातच नेतृत्व देवेंद्रजींकडेच होते व त्या नात्याने त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता.राज्यपालांनी त्याना सरकार स्थापन करण्यास अनुमती तर दिली होती पण त्याचबरोबर विधानसभेत बहुमत सिध्द करायलाही सांगितले होते. पवारांच्या मनात देवेंद्रजींबद्दल शत्रुत्वाची भावना असती तर ते त्यावेळी त्याना अडवू शकले असते.पण घडले उलटेच.त्यावेळी राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता व शक्तिपरीक्षेच्या वेळी सभात्याग करून फडणविसांच्या मुख्यमंत्रिपदाला हिरवी झेंडी दाखविली होती.पुढे काही दिवसांनी शिवसेना सरकारमध्ये सामील झाली होती व राजीनामे खिशात ठेवून सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिपदे सांभाळली होती, हा भाग वेगळा पण त्यावेळी फडणविसाना शरद पवारांची मदतच झाली होती, या वस्तुस्थितीत फरक पडत नाही.
मग असे काय घडले की, ज्यामुळे 2019मध्ये पवारांनी फडणविसाना सत्ता मिळू नये म्हणून टोकाचा प्रयत्न करून शिवसेना आणि काॅग्रेसला एकत्र आणून मविआचा डाव मांडला.केवळ भाजपा नको हेच कारण म्हणावे तर मग त्यांनी तसे 2014मध्येच का केले नाही?त्याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. कदाचित पवारांच्या राजकारणाचे अग्रक्रम बदलले असतील एवढेच आपण म्हणू शकतो.
2019 ते 2022 हा कालावधी तर महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस विरूध्द पवार अशा अर्थानेच गाजत राहिला.या काळात उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यांचा रिमोट कंट्रोल मात्र शरद पवारांच्याच हातात होता.त्यांच्या संमतीशिवाय मविआ सरकारचा एकही निर्णय होत नव्हता, अशी स्थिती होती. त्यामुळे उध्दव सरकारच्या अपयशाचीही जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडल्याशिवाय राहत नाही.पवार सरकारच्या पाठीशी असल्यानेच संजय राऊत उन्मत्तासारखे वागत आणि बोलत होते आणि पुढील पंचवीस वर्षे शिवसेना आणि उध्दवजी मुख्यमंत्रिपदी राहतील अशा वल्गना करीत होते, हे अवघ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यानी पाहिले होते व कानांनी ऐकले होते, ही काही फार जुनी गोष्ट नाही. पण राजकारणाचा व विशेषतः सत्तेच्या राजकारणाचा स्वभावच असा आहे की, तेथे कधीही आणि काहीही होऊ शकते.सत्तांतरनाट्यामध्ये तेच घडले.शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात याची कुणी तरी कल्पना केली होती काय? पण जे झाले ते आपल्यासमोर आहे.उध्दव ठाकरे यांचे हे अपयश आहेच पण त्यात मविआचे जन्मदाता या नात्याने सिंहाचा वाटा मात्र शरद पवारांचाच आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती कशी काय असू शकते ?
शरद पवार मविआ सरकारचे सर्वेसर्वा असतानाही जेव्हा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांचे तिढे सुटत नाहीत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासारखे कैबिनेट मंत्री महिनोगणती तुरूंगात सडतात, सोमय्या आणि राणादाम्पत्य प्रकरणी राडे होतात, या जबाबदारीतून उध्दव ठाकरे सुटू शकत नाहीतच पण शेवटी उध्दव ठाकरेना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडणारे शरद पवारही जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. महाराष्ट्रातील मविआचा प्रयोग फसला याचा सरळ अर्थ शरद पवारांचे राजकारण फसले असाच होतो. तो प्रयोग त्यांनी उगीच केला नव्हता.कदाचित त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील एक खेळी म्हणूनही त्यांनी तो केला असेल. पण तोच त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा पराभव ठरला.त्याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.एक बाब मात्र मान्य करावीच लागेल व ती म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाला आपल्या मुखात बंदिस्त करून वयाच्या त्र्यांशीव्या वर्षीही, समोर आशादायक परिस्थिती दिसत नसतानाही ते संघर्ष करीत आहेत. असा संघर्ष की, ज्यामुळे त्यांचे अपयशही झाले जाऊ शकते. ती त्यांच्या पराभवाला किंवा अपयशाला लाभलेली रूपेरी किनार !

ल त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply