महाराष्ट्रात विश्वासघाताचे व दुहीचे राजकारण सुरू – सामनामधून टीका

मुंबई : १७ जुलै – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यात महाविकास आघाडीकडून देखील शिंदे सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरण देऊन संजय राऊतांनी आजही तसेच राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. “दुही व विश्वासघात यांचे राजकारण शिवाजी महाराजांच्या काळातही चालले. आजही चालले आहे. चंदराव मोरे व गणोजी शिर्क्यांचेच राजकारण अजून चालू आहे. दिल्ल्लीच्या ज्या बादशहाच्या दरबारात मान वाकवायची नाही, या केवळ एका अभिमानाच्या मुद्द्यावर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्या दिल्लीच्या आजच्या दरबारात ‘‘आमचा महाराष्ट्रच नष्ट करा हो!’’ म्हणून मराठेच शिष्टमंडळे घेऊन जात आहेत.
“विश्वासघाताचे व दुहीचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. शिवछत्रपतींनंतर त्यांचा अभिमान बोलला तो फक्त लोकमान्य टिळकांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून. त्यानंतर महाराष्ट्राला तसा नेता लाभला नाही. आता तर राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्याच हाती गेले. हा बट्टय़ाबोळच आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची अभिलाषा यांनी झपाटलेले मूठभर लोक सत्तेशिवाय जणू काही देशसेवाच नाही अशा तिरमिरीने एका गटाकडे धावत सुटले आहेत. याचा सर्वात जास्त आनंद भाजपला व सध्याच्या दिल्ली दरबारास होत असेल. मोगलांना सर्व मराठे सामील होण्याचाच हा प्रकार आहे. शिवाजीराजे ‘मराठा’ होते म्हणून जादा अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजातील अनेक नेत्यांनी (लोकांनी नव्हे!) महाराष्ट्राची बेअब्रू केली आहे”, असं देखील राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.

Leave a Reply