धरणातील सांडव्याच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

यवतमाळ : १७ जुलै – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पाणीपातळीत मोठी वाढ झाली. यामुळे नदीकाठच्या तसंच इतर लोकांनाही सावध राहाण्याचा आणि कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला वारंवार दिला गेला आहे. मात्र, तरीही काही लोक या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि हेच त्यांच्या जीवावर बेततं.
यवतमाळमधून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पात पोहायला गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला आहे. सचिन बडोद असं या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या इतर मित्रांसह बेंबळा धरणावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. यावेळी सांडव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे.
यात दिसतं की काही तरुण या पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, अचानक सचिन बडोद हा तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागतो. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनाही याचा अंदाज येत नाही. मात्र, काहीच वेळात हा तरुण पाण्यात बुडू लागतो. यावेळी काही तरुण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचा काहीही उपयोग होत नाही.

Leave a Reply