देवेंद्र फडणवीस यांनी आता बदला नावाचे खाते तयार करावे – चंद्रकांत पाटील

मुंबई : १७ जुलै – ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडला पाहिजे आणि तिथे एक कडक आमदार नेमला पाहिजे, जो मागच्या अडीच वर्षांच्या काळातील घोटाळ्याची यादी तयार करेल,’ असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. पाटील यांच्या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नजीकच्या काळात चांगलीच जुंपणार असल्याचे कळते.
पाटील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सरकार पडण्याच्या रोज नव्या तारखा देत होते. मात्र गेल्या अडीच वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी दिलेली तारीख काही आली नाही. अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने ठाकरे सरकार कोसळले आणि राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आले. त्यानंतर शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा चिमटे काढले. हे सरकार पडणार होते, हे त्यांनाही माहीत होते. म्हणूनच यांनी काही केले नाही, असे ते म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीस सभेत बोलले की, मी सगळ्यांना माफ केले, पण आम्ही करणार नाही. देवेंद्र यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडला पाहिजे आणि एक कडक आमदार नेमला पाहिजे, जो मागच्या अडीच वर्षांच्या काळातील घोटाळ्याची यादी तयार करेल,’ असे पाटील यांनी सांगितले.
गेली अडीच वर्षे आपण सगळ्यांनी त्याची वाट पाहिली आहे, रात्रीनंतर दिवस येतो, असे म्हणतात, पण हे खरे झाले आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वाचे सरकार आले आहे. सगळ्यांची इच्छा आहे की, त्यांना एक उत्तम स्थान मिळावे. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ठरले होते की, वेळ येईपर्यंत काहीच बोलायचे नाही. मी वारंवार बोलायचो सरकार येईल, पण आता आलेच,’ असेही पाटील यांनी नमूद केले. ‘राज्याचा कारभार चालवताना सगळ्याच गोष्टी शक्य झाल्या नाहीत. विनायक मेटे यांना सन २०१४पासून योग्य सन्मान मिळाला नव्हता, पण आता ती वेळ आली आहे, असे वाटते आहे. अजूनही खूप अनिश्चितता आहे, सूर्य अजूनही स्पष्ट दिसत नाही, कोण आमदार आहे, कोण अंधारात आहे, हेदेखील दिसत नाही. मात्र मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तोपर्यंत न्याय मिळाला. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. ओबीसी आरक्षण घालवले, धनगर समाजाला विचारले नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply