कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर

कोल्हापूर : १७ जुलै – शिवसेनेच्या स्थापनेपासून बंडाळी नवीन नसली, तरी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचत भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षावर दावा सांगितल्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची सुनावणी घटनापीठासमोर होणार असल्याने शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरुच राहणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचे नेतेपद असून केवळ राजकीय महत्त्वकांक्षेने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसोबत केलेल्या बंडाळीनंतर आता पक्षाच्या खासदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामध्ये जाहीरपणे पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाकडे सहानुभूती दाखवणाऱ्यांमध्ये खासदार भावना यांचा समावेश होता. खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदारांची मानसिकता शिंदेंच्या छत्रछायेखाली जाण्याची झाली आहे. हे दोन खासदार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचा समावेश आहे. या दोन्ही खासदारांनी मुंबईतील मातोश्रीवरील बैठकीला तसेच कोल्हापुरात झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या.
खासदार संजय मंडलिक यांच्याकडून शिंदे कळपात सामील होण्यावर जवळपास निश्चित झालं आहे. धैर्यशील माने सुद्धा लवकरच भूमिका जाहीर करतील, अशी शक्यता आहे. या दोन खासदारांनी बंड केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला ठाणे, औरंगाबादनंतर नक्कीच मोठा राजकीय हादरा असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर बिंदू चौकात सभा घेऊन फोडत असत. बाळासाहेब आणि कोल्हापूरचे नाते अगदी अतूट असल्याने सातत्याने कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा असावा, असे सातत्याने बोलून दाखवत असत. मात्र, त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी संपूर्ण हयातीमध्ये कोल्हापूरमधून प्रत्येक निवडणुकीत नवीन उमेदवार दिला, पण कोणालाच विजय मिळवता आला नाही. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची मते नेहमीच मिळाली.

Leave a Reply