ये तेरा घर, ये मेरा घर..- श्रीनिवास बेलसरे

दिलीप धवन यांचा ‘साथ-साथ’ आला १९८२ला. रमणकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात एक अगदी ताजीतवानी जोडी होती. फारुख शेख आणि दीप्ती नवल. सिनेमाच्या मोठ्या होर्डींग्वरचा हस-या दीप्ती नवलचा मुग्ध चेहरा आणि फारुख शेखच्या चेह-यावरची निरागसता अजूनही अनेकांना आठवत असेल.

‘साथसाथ’ ही एका आदर्शवादी तरुणाची कथा. मोठ्या जमीनदाराचा मुलगा असूनही संपत्तीचा मोह नाही, समाजवादी विचार आणि उच्च जीवनमुल्ये जगण्याचा प्रयत्न, यामुळे वडिलांशी न पटून अविनाश (फारुख शेख) घर सोडतो. कॉलेजात असतानाच एका प्रकाशन संस्थेत पार्टटाईम लेखक म्हणून काम करु लागतो. तशात गीता (दीप्ती नवल) त्याच्या प्रेमात पडते आणि ते लग्न करतात. त्यांना मुल होणार असते तेंव्हा आर्थिक कुचंबणेमुळे अविनाशला अचानक सगळ्या वास्तवाची जाणीव होते आणि तो नोकरी सोडून त्याचा वर्गमित्र असलेल्या सतीश शहाच्या धंद्यात त्याचा भागीदार होतो. हळूहळू त्याच्यात अनेक बदल होऊ लागतात. ज्या गोष्टींना तो विरोध करीत होता, ज्या त्याला अजिबात आवडत नव्हत्या नेमक्या त्याच तो करू लागतो. दीप्तीला हे रुचत नाही. ती तसे अनेकदा दर्शवते. मात्र आता अविनाशचे आदर्श वा-यावर उडून गेलेले असतात.

मुळात एका श्रीमंत उद्योगपतीची मुलगी असलेली गीता हे सगळे बघून व्यथित होते. ज्याच्यासाठी आपण घर सोडले, ज्याच्यावर अतोनात प्रेम केले तो अविनाश हा नाहीच असे वाटून ती त्याला सोडायचा विचार करते.

नंतरच्या अनेक घटनांमुळे अविनाशला आपली चूक लक्षात येते आणि तो स्वार्थी जीवनशैली सोडून पुन्हा प्राध्यापक चौधरींच्या (ए.के.हंगल.) प्रकाशनसंस्थेत परत येतो. अशी ही अगदी साधीसरळ प्रेमकथा. पण जगजीतसिंग आणि चित्रासिंगच्या आवाजामुळे सिनेमाची गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.

जेंव्हा हे प्रेमी युगुल संसाराची स्वप्ने पाहत असते तेंव्हा त्यांच्या तोंडी एक सुंदर गाणे होते. त्यावेळच्या तरुण-तरुणींच्या मनात आजही ते ताजे आहे.

‘ये मेरा घर ये तेरा घर,
किसीको देखना हो गर
तो पहले आके माँग ले,
मेरी नज़र तेरी नज़र..’

हे पहिलेच कडवे ऐकले तरी अमोल पालेकर आणि झरिना वहाबचा ‘घरौंदा’ आठवल्याशिवाय रहात नाही. मुंबईच्या महागड्या स्वप्ननगरीत घर मिळवण्याचा प्रयत्न करणा-या प्रेमिकांना किती मोठ्या स्वप्नभंगाला सामोरे जावे लागते ते लक्षात येते. अमोल आणि झरीनाच्या तोंडी मरीनलाईन्सच्या उड्डाणपुलावर चित्रित झालेले गाणेही घराबद्दल होते –

   ‘दो दीवाने शहरमें, रातमें या दोपहरमें
   आबोदाना ढूँढते है, एक आशियाना ढूँढते हैं.’

त्याच्या एका कडव्यात आपसात चिवचिवत बसलेले हे लव्हबर्डस म्हणतात –

     ‘इन भूलभूलैय्या गलियोंमें
     अपनाभी कोई एक घर होगा
     अंबरपे खुलेगी खिड़की,
     या खिड़कीपे खुला अंबर होगा
     आसमानी रंगकी आँखोंमें,
     बसनेका बहाना ढूँढते हैं’

यातले स्वपाळू जग त्या वेळच्या पिढीला खूप भावले होते. कारण अर्थातच गुलजार यांची लेखणी! गुलजार त्यांच्या शब्दांनी कधी तुमची नजरबंदी करून कुठेतरी भलतीकडेच घेऊन जातात ते कळतही नाही. त्यात संगीत दिग्दर्शक जयदेव यांनी अमोलसाठी भूपिंदर आणि झरिनासाठी रुना लैलाचा आवाज निवडून आणखी बहार आणली होती. घराचे स्वप्न रंगविताना घराचे जीवनातील महत्व गुलजार सांगून जातात. त्यांनी एक अतिशय भन्नाट कल्पना या गाण्यात गुंफली होती. झरिना म्हणते –

“जब तारे ज़मींपर चलते हैं
आकाश ज़मीं हो जाता है,
उस रात नहीं फिर घर जाता,
वो चांद यहीं सो जाता है”

कसली भन्नाट कल्पना! म्हणजे यांचे घर इतके सुंदर की ते पाहून चंद्र त्यांच्याकडेच रमतो आणि ‘स्वत:च्या घरी जायचे विसरून’ यांच्याकडेच झोपी जातो! एखादा लहान मुलगा शेजारच्यांकडे खेळायला जावा आणि खेळतखेळत तिथेच झोपून जावा तसली गुलजार यांची ही उपमा! पण मग असली परीकथेत शोभण्यासारखी प्रतीके इतक्या सहज दुसरे कोण वापरु शकणार ना?

मात्र या ‘घरौंदा’चा शेवट खूप उदास करून टाकणारा होता. मुंबईच्या विकराल महानगरात अगदी छोटेसे स्वप्न पाहणा-या या निष्पाप युगुलाचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात.
नियती त्यांचे हे साधेसे स्वप्न पायाखाली तुडवून नष्ट करते. नायिका आपल्या दुप्पट वयाच्या श्रीराम लागूंशी लग्न करते. आणि नायक उध्वस्त होऊन परत त्याच स्थळांना भेटी देत हे महानगर सोडून जायचा निर्णय घेतो असे दाखवले होते. गुलजार टचमुळे ‘घरौन्दा’चे प्रत्येक दृश्य मनावर एक ओरखडा उमटवूनच जाते.

दिलीप धवन यांच्या ‘साथ-साथ’ची कथा इतकी दु:खद नव्हती. जावेद अख्तर यांची गाणी अर्थातच श्रोत्यांना सहज स्वप्नसृष्टीत घेऊन जाणारी असतात तरीही या गाण्यात त्यांचे प्रेमिक वास्तवाचे भान ठेवणारे आहेत –

 ‘ना बादलोंकी छाँवमें, ना चांदनीके गाँवमें
 ना फूल जैसे रास्ते, बने हैं इसके वास्ते
 मगर ये घर अजीब है, ज़मीनके करीब है
 ये ईंट-पत्थरोंका घर, हमारी हसरतोंका घर
 ये मेरा घर ये तेरा घर....’

फार मोठ्या स्वप्नात राहणे काही खरे नाही म्हणून जावेदसाहेबांनी हे प्रेमिक ‘आहे त्यात आनंद शोधणारे’ चितारले आहेत. ते स्वत:च म्हणतात –

‘जो चांदनी नहीं तो क्या, ये रौशनी है प्यारकी
दिलोंके फूल खिल गए, तो फ़िक्र क्या बहारकी
हमारे घर ना आएगी, कभी खुशी उधारकी
हमारी राहतोंका घर, हमारी चाहतोंका घर
ये तेरा घर, ये मेरा घर…’

असेच घराबद्दल एक अतिशय रोमँटिक विचार मांडणारे गाणे होते हसरत जयपुरी यांचे! चित्रपट ‘तेरे घरके सामने’ (१९६३) संगीत सचिनदेव बर्मन. प्रत्येक प्रेमवीराला हे गाणे हसरतजींनी आपल्यासाठीच रचले आहे असे वाटायचे –

    ‘एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने
    दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने’

अशीच ‘धूलका फुल’ (१९५९)मध्ये महेंद्र कपूर आणि लतादीदीची जुगलबंदी होती! गाण्याचे बोल होते, ‘तेरे प्यारका आसरा चाहता हुं, वफा कर रहा हुं, वफा चाहता हुं.’ प्रियकराचा प्रत्येक दावा प्रेयसी खट्याळपणे खोडून काढते असे दाखविले होते. ‘तेरे घरके सामने’मधेही तसेच होते. प्रियकर आव्हान देतो ‘मी तुझ्या घरासमोरच माझे घर बांधीन.’ तेंव्हा त्याचे म्हणणे खोडून काढत प्रेमिका म्हणते –

‘घरका बनाना कोई आसान काम नहीं
दुनिया बसाना कोई आसान काम नहीं’

पण इरेला पडलेला प्रियकर पुन्हा आपला प्रस्ताव पुढे सरकवताना म्हणतो –

     ‘दिलमें वफायें हो तो, तूफां किनारा है
     बिजली हमारे लिए प्यारका इशारा है
     तन मन लुटाऊंगा, तेरे घरके सामने’

हे पूर्ण गाणे म्हणजे सरळ एक खोडकर जुगलबंदी असल्यामुळे प्रेमिका तरीही मान्य करत नाही. ती म्हणते –

‘कहते है प्यार जिसे दरिया है आगका
या फिर नशा है कोई जीवनके रागका’

त्याचे उत्तर असते –

‘दिलमें जो प्यार हो तो, आगभी फूल है
सच्ची लगन जो हो तो, परबतभी धूल है
तारें सजाऊँगा, तेरे घरके सामने.’

शेवटी जेंव्हा प्रेयसी विचारते –

‘काटों भरे हैं लेकिन चाहत के रास्ते
तुम क्या करोगे देखे उल्फत के वास्ते?’

त्यावेळी हसरत जयपुरी यांनी दिलेले उत्तर मोठे साहित्यिक आणि विद्वत्तापूर्ण होते. ते सलीम अनारकलीच्या प्रेमाची कहाणी आणि शहाजहान-मुमताजच्या प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालची कथा मोठ्या खुबीने या गाण्यात गुंफतात. पण किती किमान शब्दात! –

     उल्फत में ताज छूटे, ये भी तुम्हे याद होगा
     उल्फत में ताज बने, ये भी तुम्हे याद होगा
     मैं भी कुछ बनाऊंगा, तेरे घर के सामने!

तिने वारंवार पाणउतारा केल्यावर आणि आपल्या मर्यादांची जाणीव करून दिल्यावरही बिचारा प्रियकर जेंव्हा म्हणतो म्हणतो ‘मैं भी कुछ बनाउंगा’ तेंव्हा नक्की त्याच्या प्रेयसीला भरून आले असेल.

कधी असे नॉस्टॅल्जिक मूडमध्ये गेलात तर लक्षात ठेवा अशी सुरेल गाणी, भाबडी स्वप्ने आणि मनस्वी शायर आठवले की मनातल्या मनात एक स्वप्नमहाल बांधायचा! आणि देवून टाकायचे असते एकेक दालन, एकेका सम्राटाला!

श्रीनिवास बेलसरे

दैनिक प्रहारवरुन साभार….

Leave a Reply