वर्धा : १५ जुलै – जिल्ह्यातील काटोल येथील नबिरा महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या व्यक्तीने नागपूर-अमरावती महामार्गावर वर्धा नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना खंडका नजीक घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राध्यापकाने नदीत उडी घेतल्याचे नागरिकांना दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने नदी दुभडी भरून वाहत असल्याने अद्याप मृतदेह आढळून आलेला नाही.
विनोद केशव बागवाले (४५) रा. यवतमाळ, असे आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथील नबिरा महाविद्यालयात ते कार्यरत असून गुरुवारी सकाळी ते एम.एम. ४० ए.आर.३०५२ क्रमांकाच्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खंडका नजीकच्या वर्धा नदीजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी करून नदीत उडी घेतली. हा प्रकार काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती तळेगाव (श्याम.पंत) येथील पोलिसांना देताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
एसडीआरएफच्या चमुलाही पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.अद्यापही थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र १८ जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते.