ते आता राज्य सरकारलाच विचारा – नामांतराच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया

नागपूर : १५ जुलै – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. दरम्यान नामांतराच्या निर्णयावर स्थगिती दिल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारलाच यासंबधी विचारावं लागेल असं म्हटलं आहे.
शरद पवार आज नागपुरात असून हॉटेलबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नामांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ‘ते आता राज्य सरकारलाच विचारा’ असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
दरम्यान दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “यादी तयार केली आहे, पण “.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “नेमके आदेश काय आहेत ते बघितले जाईल आणि त्यावर सर्वपक्षीय नेते विचार विमर्श करतील. अध्यक्षांनी त्यावर अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे सत्य काय आहे ते पाहू”.
‘भ्रष्टाचार’, ‘बालीशपणा’, ‘नक्राश्रू’ असे दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले आहेत. सूचिबद्ध असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यास आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाला आहे.

Leave a Reply