संपादकीय संवाद – पेट्रोल डिझेलवर करसवलत दिल्यामुळे होणारा तोटा तंबाखू, सिगारेट आणि दारूवर दुपटीने कर लावून भरून काढा

राज्यमंत्रिमंडळाने आज पेट्रोल आणि डिझेलवर लावल्या जाणाऱ्या करात कपात केली आहे, हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळे थोडा का होईना पण जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या सुमारे वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढतच होते, त्यामुळे जनसामान्य त्रस्त झाला होता, डिझेलचे दर वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि मालवाहतूक या दोन्हींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. सध्याच्या वाढत्या महागाईत हा अधिकचा फटका होता. त्यामुळे जनसामान्य त्रस्त झाले होते.
जनसामान्यांची अडचण लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात थोड्या प्रमाणात कपात केली होती, उर्वरित कपात राज्य सरकारांनी त्यांच्या करांमध्ये करावी, असे केंद्र सरकारने सुचवले होते. केंद्राच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही राज्यांनी करात कपात केली होती, मात्र महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार राज्यात कोण्ताही कर कमी करायला तयार नव्हते. त्याचवेळी केंद्र सरकारने अजून दिलासा द्यायला हवा, अशी मागणी राज्य सरकार करत होते. राज्य सरकार गठीत करण्यासाठी बनवलेल्या महाआघाडीतील सर्व घटक पक्ष देखील पेट्रोलवरील कर कमी करावा या मागणीसाठी राज्यात आंदोलने करीत होते. मात्र लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या न्यायाने स्वतः काहीही करायला तयार नव्हते. राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षांनी अनेकदा इतर राज्यांची उदाहरणे देत, आपल्या सरकारनेही कर कमी करावा यासाठी आग्रह धरला होता. मात्र महाआघाडी सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत होते.
राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आणि शिंदे फडणवीस युतीचे सरकार आले, या सरकारने शपथविधी होताच, लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली जाईल, असे संकेत दिले होते, त्यानुसार आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
करात दिलेली सवलत घसघशीत म्हणावी अशी निश्चितच नाही, देशात मोदी सरकार आले, तेव्हा पेट्रोलचा भाव ८० रुपये लिटरच्या आसपास होता, आज महाराष्ट्रात तो १११ रुपये लिटर आहे, ही बाब लक्षात घेता फक्त ५ रुपयांची सवलत खूपशी दिलासादायक नाही, असे असले तरी एक आशादायक सुरुवात म्हणून या करकपातीचे स्वागत करायलाच हवे. या कर कपातीमुळे राज्याच्या महसुलात दरवर्षाला १० हजार कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, हा तोटा दारू, सिगारेट, तंबाखू अश्या व्यसन लावणाऱ्या वस्तूंवर दुपटीने कर लावून भरून काढावा अशी पंचनामाची सूचना आहे. जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी मूठभर व्यसनी लोकांना वेठीला धरायला काहीच हरकत नाही.

अविनाश पाठक

Leave a Reply