विदर्भात पावसाचे थैमान, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

नागपूर : १४ जुलै – नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसलेला आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, तलाव आणि धरण ओसंडून वाहत आहेत. लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात तब्बल दहा लोकांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर आत्तापर्यंत २० लोकांनी आपला जीव गमवावा आहे. नागपूर शहरातील कळमना वस्तीत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरातील सर्व सामान आणि अन्न-धान्य भिजल्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने अनेकांचे संसार भिजले आहेत. नागपूरच्या कळमना वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने वस्तीतील लोकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे घरात पाणीचं पाणी साचले आहे. संपूर्ण रात्र घरातील घाण पाणी बाहेर काढण्यात गेली. आज पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने शेकडो परिवार सुरक्षित निवाऱ्याच्या शोधत घरबाहेर पडले आहेत. शहरातील वैभवात भर घालणारा अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. गोरेवाडा तलाव सुद्धा भरून वाहत आहे. गोरेवाडा तलावाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नवेगाव धरणाचे १६ दरवाजे,उमरेड धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे एक जूनपासून १३ जुलैपर्यंत विविध घटनेत २० जण मृत्युमुखी पडले आहेत तर १९ जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या ४८ तासात दहा लोकांना जीव गमवावा लागला आहे.
अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले : गेली सहा ते सात दिवसांपासून अमरावतीसह महाराष्ट्राभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने अमरावती जिल्ह्यात पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे एकूण तेरापैकी सात दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणा काठच्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मेळघाटमधील सिपना तापी या मोठ्या नद्यांना पूर आल्यामुळे धारणी तालुक्यातील एकूण 27 गावांचा संपर्क तुटला आहे. धारणीसह चिखलदरा तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सिपना नदीला आलेल्या पुरामुळे बिया गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पुलावरून पाच फूट पाणी वाहून गेले, यामुळे जवळपास वीस गावांचा संपर्क धारणी शहरापासून तुटला होता.
यवतमाळमधील निळोणा धरण ओव्हर फ्लो : पाण्याची टंचाई आणि यवतमाळकर हे जणू समीकरणच आहे. यवतमाळकरांची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून निळोणाकडे पाहिले जाते. यंदाच्या संततधार पावसात यवतमाळकरांची तृष्णा भागविणारा निळोणा प्रकल्प आज ( गुरुवारी ) ओव्हर फ्लो झाला. सध्या या प्रकल्पातून ओसंडून पाणी वाहत आहे. त्याचप्रमाणे शहराचा भौगोलिक व्याप बधता चापडोह प्रकल्पाची निर्मिती झाली होती. या संततधार पावसामुळे चापडोह प्रकल्प देखील ८० टक्के भरला असून, येणार काही दिवसांमध्ये हा प्रकल्प सुद्धा ओव्हर फ्लो होण्याची चिन्हे आहेत.
चंद्रपुरात पावसाचा हाहाकार : चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजला असताना चंद्रपूर पोलीस नागरिकांना वाचविण्यासाठी देवदूतासारखे धावून येत आहेत. यापूर्वी विरुर पोलिसांनी पुरात अडकलेल्या 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले होते. तर 14 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजता गडचांदूर पोलिसांनी 2 दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले. जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत. आता गोसेखुर्द धरणाचे सुद्धा काही दरवाजे उघडले असून चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे.

Leave a Reply